
दुष्काळग्रस्त तालुक्यातील ९४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना४ हजार ७०१ कोटींचे अर्थसाहाय्य वितरित,एकही पात्र शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचित राहणार नाही – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील
बुलबुलढाण प्रतिनिधी: राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे दुष्काळ अग्रीम वितरित करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार ५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मोठ्या प्रमाणावर अग्रीम वाटप करण्यात आले. १६ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ९४ लाख ३ हजार २२४ शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण ४ हजार ७०१ कोटी ६१ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील एकही पात्र शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचित राहणार नाही. ई-केवायसी, फार्मर आयडी या तांत्रिक अडचणींमुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही, त्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा आणि शेतीच्या पुढील हंगामासाठी आवश्यक खर्चाची तरतूद करता यावी, या उद्देशाने शासनाने पाच हजार रुपयांचे दुष्काळ अग्रीम देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असून, पात्र शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे
विभागनिहाय आणि जिल्हानिहाय मदतीचे वितरण,मदत व पुनर्वसन विभागाच्या १६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सहा महसूल विभागांमध्ये आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या मदतीचे चित्र पुढीलप्रमाणे आहे.
अमरावती विभाग : या विभागात १५ लाख ३१ हजार ५३४ शेतकऱ्यांना ७६६ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित झाले आहे. अकोला जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ४३४ शेतकऱ्यांना १११ कोटी २२ लाख रुपये, अमरावती जिल्ह्यातील ३ लाख २२ हजार ६७३ शेतकऱ्यांना १६१ कोटी ३४ लाख रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ४ लाख ३१ हजार ४५ शेतकऱ्यांना २१५ कोटी ५२ लाख रुपये, वाशिम जिल्ह्यातील २ लाख ७९० शेतकऱ्यांना १०० कोटी ४० लाख रुपये, तर यवतमाळ जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार ५९२ शेतकऱ्यांना १७७ कोटी ३० लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.पुणे विभाग : या विभागातील १५ लाख ७६ हजार ८२ शेतकऱ्यांना ७८८ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य वितरित करण्यात आले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ८१ हजार २०० शेतकऱ्यांना ४० कोटी ६० लाख रुपये, पुणे जिल्ह्यातील ३ लाख ४१ हजार ४३१ शेतकऱ्यांना १७० कोटी ७२ लाख रुपये, सांगली जिल्ह्यातील २ लाख ४८ हजार ७३७ शेतकऱ्यांना १२४ कोटी ३७ लाख रुपये, सातारा जिल्ह्यातील ३ लाख २ हजार ७९५ शेतकऱ्यांना १५१ कोटी ४० लाख रुपये, तर सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख १ हजार ९१९ शेतकऱ्यांना ३०० कोटी ९६ लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे
नाशिक विभाग : या विभागात २० लाख २ हजार ४१० शेतकऱ्यांच्या खात्यांवर १ हजार १ कोटी रुपयांची मदत जमा झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ८ लाख १३ हजार ८६६ शेतकऱ्यांना ४०६ कोटी ९३ लाख रुपये, धुळे जिल्ह्यातील २ लाख २ हजार ३६२ शेतकऱ्यांना १०१ कोटी १८ लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील ४ लाख ३० हजार ४३५ शेतकऱ्यांना २१५ कोटी २२ लाख रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ९०८ शेतकऱ्यांना ५३ कोटी ९५ लाख रुपये, तर नाशिक जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार ८३९ शेतकऱ्यांना २२३ कोटी ९२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
छत्रपती संभाजीनगर विभाग : या विभागातील सर्वाधिक ३४ लाख ९ हजार ६२ शेतकऱ्यांना १ हजार ७०५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील ६ लाख १३ हजार ५३४ शेतकऱ्यांना ३०६ कोटी ७७ लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ लाख ७७ हजार १४२ शेतकऱ्यांना २३८ कोटी ५७ लाख रुपये, धाराशिव जिल्ह्यातील ३ लाख ५४ हजार ७३१ शेतकऱ्यांना १७७ कोटी ३७ लाख रुपये, हिंगोली जिल्ह्यातील २ लाख २४ हजार ३५७ शेतकऱ्यांना ११२ कोटी १८ लाख रुपये, जालना जिल्ह्यातील ४ लाख ४५ हजार ८१ शेतकऱ्यांना २२२ कोटी ५४ लाख रुपये, लातूर जिल्ह्यातील ३ लाख ८२ हजार ५६९ शेतकऱ्यांना १९१ कोटी २८ लाख रुपये, नांदेड जिल्ह्यातील ५ लाख ६८ हजार २२० शेतकऱ्यांना २८४ कोटी ११ लाख रुपये, तर परभणी जिल्ह्यातील ३ लाख ४३ हजार ४२८ शेतकऱ्यांना १७१ कोटी ७१ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
नागपूर विभाग : या विभागातील ८ लाख १२ हजार ३१२ शेतकऱ्यांना ४०६ कोटी १६ लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यातील १ लाख ११ हजार २६२ शेतकऱ्यांना ५५ कोटी ६३ लाख रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख १ हजार २०३ शेतकऱ्यांना १०० कोटी ६० लाख रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील ३१ हजार ५८९ शेतकऱ्यांना १५ कोटी ७९ लाख रुपये, गोंदिया जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ९४५ शेतकऱ्यांना ५२ कोटी ४७ लाख रुपये, नागपूर जिल्ह्यातील २ लाख ६ हजार ५०७ शेतकऱ्यांना १०३ कोटी २५ लाख रुपये, तर वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार ८०६ शेतकऱ्यांना ७८ कोटी ४० लाख रुपये वितरित झाले आहेत.
कोकण विभाग : या विभागातील ७१ हजार ८२४ शेतकऱ्यांना ३६ कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील ९ हजार ७७६ शेतकऱ्यांना ४ कोटी ८९ लाख रुपये, रायगड जिल्ह्यातील २ हजार २३४ शेतकऱ्यांना १ कोटी १२ लाख रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ५६९ शेतकऱ्यांना ११ कोटी २८ लाख रुपये, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३७ हजार २४५ शेतकऱ्यांना १८ कोटी ६२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत.
ई-केवायसी आणि फार्मर आयडी पूर्ण करण्याचे आवाहन,ॲग्रीस्टॅक (AgriStack) डेटाच्या माध्यमातून कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. पूर्वी ई-केवायसी आणि फार्मर आयडी असलेल्या आणि ज्या शेतकऱ्यांनी १ नोव्हेंबर २०२५ पर्यंत कोणत्याही विभागाचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी केली असल्यास त्यांना पुन्हा ई-केवायसीची आवश्यकता नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी, ई-केवायसी केली नाही, अशा शेतकऱ्यांना मदत देण्यापूर्वी त्यांची आधारसंलग्न बँक खाते पडताळणी होणे आवश्यक आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी असल्यास त्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य करण्यात येईल. राज्यातील एकही पात्र शेतकरी दुष्काळ मदतीपासून वंचित राहणार नाही. मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांचा ई-केवायसी व फार्मर आयडी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पाच हजार रुपयांची दुष्काळ अग्रीम मदत देण्यात येईल. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी स्पष्ट केले.
000



