
कृषी पदवीधरांसाठी परभणीत ‘महा मेगा भरती’ मेळावा संपन्नउमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, २०० हून अधिक रोजगार संधी,पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन,कृषी पदवीधरांनी आधुनिक शेतीतून रोजगारनिर्मितीवर भर द्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर
परभणी, प्रतिनिधी: परभणी जिल्ह्यात कृषी क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव असून, कृषी पदवीधर युवकांनी आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून शेतीला उद्योजकतेची जोड द्यावी व रोजगारनिर्मिती भर द्यावा, असे आवाहन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.जिल्ह्यातील कृषी पदवीधरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासह कृषी क्षेत्रातील नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे संपर्क कार्यालय येथे आयोजित कृषी पदवीधरांच्या ‘महा मेगा भरती’ रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते मेळाव्याची उद्घाटन पार पडले. मेळाव्यात २०० हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली.
कार्यक्रमास उद्योजक मॅजिक प्रा.लि.चे संचालक आशिष गर्दे , ग्रोनिवा कॉ. प्रा.लि.चे संचालक सचिन काटे, पालवी ऍग्रीको प्रा.लि.संचालक नितिन इंगोले, पालवी ऍग्रीको प्रा.लि.चे सी.ई.ओ., राहुल जाधव , जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, कृषी पदवीधरांसाठी अशा प्रकारचा विशेष रोजगार मेळावा प्रथमच आपल्या जिल्ह्यात आयोजित होत असल्याचा अभिमान आहे. पालवी अँग्रो कंपनीच्या माध्यमातून कृषी पदवीधरांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून, जिल्ह्यात कंपनीचे कार्यालय सुरू होणार असल्याची बाबही आनंददायी आहे. या उपक्रमातून सर्व पात्र उमेदवारांना संधी मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
परभणी जिल्हा हा नद्या, धरणे, तलाव, रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांनी समृद्ध असून, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी येथे मोठ्या संधी आहेत. जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असल्याने येथून दरवर्षी कृषी पदवीधर शिक्षण घेऊन बाहेर पडतात. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. दरम्यान, कृषी पदवीधरांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा प्रयत्न करावा. बी.एस्सी. अॅग्री शिक्षण घेतलेल्या युवकांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करावेत. फळबाग लागवड, कृषी आधारित उद्योग आणि उत्पादित मालाची निर्यात यावर भर द्यावा. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मूल्यवर्धित सुविधा उपलब्ध करून देणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे, असेही पालकमंत्री यांनी सांगितले.
मी सर्वप्रथम शेतकरी आहे. स्वतः सेंद्रिय शेती करते. त्यामुळे शेतीतील अडचणी आणि संधींची मला जाणीव आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजना आणि अनुदानाचा लाभ युवकांनी व शेतकऱ्यांनी घ्यावा. परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन मिळण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. ‘इन्व्हेस्ट इन परभणी’च्या माध्यमातून यापूर्वीही गुंतवणुकीसाठी प्रयत्न झाले आहेत. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्येही असे उपक्रम राबविता येऊ शकतात. जिल्हा २०४७ पर्यंत विकसित करण्याच्या ध्येयपूर्तीसाठी युवकांचे भविष्य उज्ज्वल होणे महत्त्वाचे आहे. युवकांचे भविष्य उज्ज्वल झाले तर जिल्ह्याचे भविष्यही उज्ज्वल होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला
पालवी अँग्रो कंपनीचे श्री. इंगोले यांनी सांगितले की, जिल्ह्याच्या विकासात योगदान देण्यासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील राहील. कृषी आधारित उद्योगांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. परभणी जिल्ह्यात कृषी विद्यापीठ असल्याने येथील कृषी पदवीधरांना रोजगाराची संधी मिळावी, हा कंपनीचा मानस आहे.
यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्रशांत खंदारे यांनी कृषी पदवीधरांसाठी आयोजित या विशेष रोजगार मेळाव्याचे महत्त्व अधोरेखित केले. शासनाच्या विविध अनुदान व सबसिडी योजनांचा लाभ घेऊन युवकांनी कृषी क्षेत्रात स्वतःचे उद्योग उभारावेत. आज २०० उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होत असून, भविष्यात यापेक्षाही मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावे आयोजित करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
या मेळाव्यात पालवी अँग्रीको प्रायव्हेट लिमिटेडसह विविध उद्योजकांच्या माध्यमातून कृषी पदवीधरांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या. बी.एस्सी. अॅग्री, एम.एस्सी. अॅग्री, अॅग्रीकल्चर डिप्लोमा तसेच बी.एस्सी. शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविला.
***



