
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी सक्रीय सहभाग नोंदवावा-विभागीय आयुक्त निधी पाण्डेय*दिव्यांग, तृतीयपंथी मतदारांशी संवाद*लोकसभा निवडणुकीचा आढावा
बुलडाणा, प्रतिनिधी : लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व घटकांनी सक्रीय सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, युवक, तृतीयपंथी यांच्या सर्व मतदारांनी मतदानासाठी समोर येऊन मतदान करावे, तसेच मतदानासाठी इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन विभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांनी केले.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीमती पाण्डेय यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांना मतदान करण्यासाठी शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचरकर, निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, समाज कल्याण सहायक आयुक्त अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत आदी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीच्या तयारी आढावा घेताना श्रीमती पाण्डेय यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षास भेट दिली. त्यांनी मतदार हेल्पलाईन, सी-व्हिजील, सीसीटीव्ही यंत्रणा आदींची माहिती घेतली. मतदार हेल्पलाईनवर येणाऱ्या दूरध्वनीबाबत कॉलसेंटरप्रमाणे उपस्थित कर्मचारी यांनी आपली ओळख द्यावी. त्यानंतर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, ही माहिती देताना नम्रपणे ही माहिती देण्यात यावी. निवडणुकीच्या कालावधीत नियंत्रण कक्ष महत्वाची भूमिका बजावित असते. या कक्षाने इतर नियंत्रण कक्षाच्या संपर्कात राहावे. जिल्ह्याला इतर राज्याची सिमा आहे. याठिकाणी असलेल्या चेकपोस्टवरील यंत्रणा सक्षमपणे सुरू ठेवावी. निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. फिरत्या पथकांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यावेळी त्यांनी थांबलेल्या पथकांशी संपर्क साधून माहिती घेतली.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. महिला मतदारांची टक्केवारी अधिक आहे. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घ्यावे. ही निवडणूक मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्रीमती पाण्डेय यांनी यावेळी केले. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक घटकांचा सहभाग वाढविण्यासाठी विविध घटकांशी संवाद साधून त्यांचा सहभाग नोंदवून घेण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आज श्रीमती पाण्डेय यांनी दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली. तसेच तृतीयपंथी आणि दिव्यांग मतदारांच्या समस्या जाणून घेतल्या. मतदान केंद्रावर ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना व्हील चेअर आणि मतदान केंद्रावर जाण्या-येण्याची व्यवस्था करण्याबाबत माहिती घेतली.
000000



