
ग्राहकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर जिमाका)- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना ही ग्राहकांच्या हक्काचे संवर्धन आणि संरक्षणासाठी असून ग्राहकला योग्य दरात सेवा, गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळण्याचा अधिकार आहे. ग्राहकाच्या हिताचे व हक्कांचे संरक्षण आणि झालेल्या अन्यायाविरुद्ध तक्रारीची दखल घेऊन तात्काळ उपायोजना कराव्या असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले. ग्राहक मंचामध्ये तक्रार करण्याबाबत जाणीव जागृती करून ग्राहकाला त्यांच्या हक्काचे संरक्षण मिळवून द्यावे , असे निर्देश ग्राहक संरक्षण परिषद समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सुचित केले.
ग्राहक संरक्षण समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, कार्यकारी अभियंता महावितरण पी. व्ही. बनकर, उपअभियंता बीएसएनएल कासम ताहेर, एसटी महामंडळा विभाग नियंत्रक पी.डी.चव्हाण, अन्न औषध प्रशासन अधिकारी अजित मैत्रे, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य शेख अनवर शेख केसर, संगीता धारूरकर, नानक वेदी, धनंजय मुळे, अशोक ठोंबरे,रावसाहेब नाडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी बैठकीत निर्देश दिले की, शेतकऱ्यांना खते, बी- बियाणे याची विक्री रास्त दरात होईल याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी जास्त दर आकारला जाईल त्या तक्रारीचे निवारण संबंधित तहसिलदारांनी तात्काळ करावे. रेशन दुकानावर अन्नधान्याचे वितरणाबाबत तक्रारींचीही तात्काळ दखल घेऊन उपाययोजना पुरवठा विभागामार्फत करण्यात यावी. वजने-मापे नियंत्रकांनी प्रत्येक व्यापाऱ्याकडील वजन मापाची नोंदणी, तपासणी करुन अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या.
०००००



