
दिपावली सणानिमित्त फटाके परवान्यासाठी अर्ज सादर करावेत
जालना, (जिमाका) :- दिपावली सणानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाका विक्री होत असते. विस्फोटक नियम 2008 मधील कलम 84 अन्वये तात्पुरता फटाका विक्री करण्याचे परवाने निर्गमित होत असतात. तात्पुरता फटाका विक्री परवान्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असतात. तरी तात्पुरता फटाका विक्री, नुतनीकरण व नवीन तात्पुरता फटाका परवान्यासाठीचा अर्ज दि. 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयास सादर करावेत. असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
दिपावली सणानिमित्त तात्पुरते परवाने विहीत मुदतीत देणे सुलभ व्हावे यासाठी यावर्षी फटाका परवाना देतांना विहीत पध्दतीने काम करण्यात येत असते. फटाका विक्री परवान्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, परवाना धारकाचा फोटो, पॅन कार्ड (अनिवार्य), मतदान ओळखपत्र/ फोटो असलेला कुठलाही पुरावा, महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, अजिविका व नोकऱ्यावरील कर अधिनियम 1975 नुसार व्यवसाय कर अधिकारी यांच्याकडील नादेय प्रमाणपत्र, आयुक्त तथा प्रशासक जालना महानगर पालीका/मुख्याधिकारी नगर परिषद,नगरपंचायत,ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे स्थळदर्शक नकाशासह ना हरकत प्रमाणपत्र, नवीन परवाना धारकांसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्रासह नाहरकत आदि कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर नियमाप्रमाणे परवाना शुल्क, नुतनीकरण शुल्क शासन जमा करण्यासाठी शासकीय चलन देण्यात येईल. तसेच सर्व तात्पुरता फटाका विक्री परवाने वेळेत देण्यात येतील. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
-*-*



