
ठाणे परिवहन विभागाचे वरिष्ठ लिपिक प्रवीण तांडेल यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करून कारवाई करण्याचे परिवहन उपायुक्त यांचे आदेश वसई परिवहन विभागात खळबळ.
ठाणे (प्रतिनिधी) परिवहन विभागाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई येथे कार्यरत असणारे प्रवीण तांडेल वरिष्ठ लिपिक यांनी अवैध संपत्ती जमा केल्याच्या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी ठाणे परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र किसन गायकवाड यांना अलीकडच्या काळात त्यांचे कडील पत्र क्रमांक पआका/कार्या-८अ/तक्रार/२३/२०२१, जा.क्र. १०४८६, दिनांक १० ऑगस्ट २०२१ अन्वये दिले आहेत.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ठाणे प्रादेशिक विभागाअंतर्गत ठाणे, कल्याण, नवी मुंबई व वसई येथील परिवहन विभागात गैरव्यवहार, अनियमितता, भ्रष्टाचार खूपच जास्त प्रमाणात वाढला असून भ्रष्ट कारभार केल्याशिवाय तेथील अधिकारी-कर्मचारी जनतेची कामे करीत नाहीत. तसेच ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी-कर्मचारी शासन निर्णयाची सर्रासपणे अहवेलना व पायमल्ली करीत आहेत. शासनाच्या निर्णयाप्रमाणे सर्व शासकीय कर्मचारी यांनी सेवा प्रवेश करताना त्यांच्या संपत्तीची माहिती शासनास देणे आवश्यक आहे. परंतु उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करणारे प्रवीण तांडेल यांनी भ्रष्ट मार्गाने जमा केलेली अवैध संपत्ती दडविण्याकरिता शासनाच्या सेवेत प्रवेश करताना संपत्तीची माहिती शासनास सादर न केल्याची माहिती राष्ट्रीय मानव हक्क मंच चे अध्यक्ष शरद काशिनाथ धुमाळ यांनी केंद्रीय माहितीच्या अधिकारा अंतर्गत प्राप्त केली होती व त्यास अनुसरून शरद धुमाळ यांनी प्रवीण तांडेल वरिष्ठ लिपिक यांच्या अवैध संपत्तीची चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव (परिवहन विभाग) यांचेकडे केली असता धुमाळ यांच्या निवेदनाची गंभीर दखल प्रधान सचिव यांनी घेऊन प्रवीण तांडेल यांच्या गैरकारभाराची व भ्रष्ट मार्गाने जमा केलेल्या अवैध संपत्तीची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याचे परिवहन उपायुक्त जितेंद्र पाटील यांनी ठाणे परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांना दिले असून त्यामुळे ठाणे परिवहन विभागात खळबळ माजली आहे.
प्रस्तुत प्रकरणी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाचे प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता वरिष्ठ लिपिक प्रवीण तांडेल यांची नियमानुसार चौकशी करून कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया गायकवाड यांनी दिली आहे.



