vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

तरुणांमध्ये नेतृत्त्वक्षमता विकसित करण्यासाठी विद्यापीठे, उद्योगसंस्थांमध्ये भागीदारीची गरज – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

पुणे, प्रतिनिधी : तरुण पिढीमध्ये बदलत्या जागतिक परिस्थितीत नेतृत्त्व, नवप्रवर्तक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते आदी भूमिका बजावण्याची प्रचंड क्षमता आहे. ही क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी विद्यापीठे, उद्योग आणि नवोद्योजकांना साथ, प्रोत्साहन देतील अशा संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

पुणे इंटरनॅशनल सेंटर पाषाण येथे हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या (एचईएफ) पुणे डिस्ट्रिक्ट चॅप्टरतर्फे आयोजित ‘शक्ती समिट-२०२६’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य आणि लष्कराच्या दक्षिण कमांडाचे माजी जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग (निवृत्त), क्विंटसेन्स फ्रॅग्रान्सेस प्रा. लि.चे अध्यक्ष भरत कामटे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव, एचईएफचे अध्यक्ष तथा ‘पार्टेक्स एआय’चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी गौरव त्रिपाठी आदी उपस्थित होतेहिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे स्मरण करून राज्यपाल श्री. वर्मा म्हणाले, हा राज्याभिषेक सोहळा आपल्या अस्मितेचे, सामर्थ्याचे आणि आत्मविश्वास दर्शविणारा होता. त्यांनी प्रतिकूल परिस्थितून राज्याची उभारणी केली. सामान्य शेतकऱ्यांमधून सैन्य तयार केले. त्यांनी आधुनिक नौदलाचा पाया घातला. न्याय, समानता व सर्व धर्मांचा आदर यावर आधारित सुशासनाचा प्रेरणादायी आदर्श त्यांनी निर्माण केला.

राज्यपाल म्हणाले, जगाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेले संघर्ष आणि भू-राजकीय तणाव या केवळ प्रादेशिक घडामोडी नसून त्यांच्यामध्ये संपूर्ण जागतिक व्यवस्थेलाच नव्याने आकार देण्याची क्षमता आहे. जगात पुरवठा साखळ्यांची पुनर्रचना होत आहे. भू-राजकीय वास्तव बदलत आहे आणि नवीन तंत्रज्ञान अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडवत आहे. अशा वेळी भारताला मोठ्या संधी आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण, एरोस्पेस, रोबोटिक्स, प्रगत उत्पादन, ऊर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि डिजिटल अर्थव्यवस्था ही क्षेत्रे आता राष्ट्रीय सामर्थ्य आणि स्पर्धात्मकतेचे धोरणात्मक आधारस्तंभ आहेत. भारतासारख्या विशाल राष्ट्राच्या आकांक्षा आणि सांस्कृतिक महत्त्वानुसार आर्थिक सामर्थ्य आणि सामरिक सामर्थ्य अविभाज्य आहेत, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले, २०४७ पर्यंत ‘विकसित भारत’ही संकल्पना प्रत्यक्षात येणे म्हणजेच सामाजिक-आर्थिक उतरंडीवरील शेवटच्या व्यक्तीचे कल्याण, प्रतिष्ठा आणि हित जपले जाणे हेच आहे. विकासाचे लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आणि देशातील प्रत्येक प्रदेशापर्यंत पोहोचतात, तेव्हाच विकास खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण ठरतो. त्यामुळे आपली प्रगती सर्वसमावेशक, शाश्वत आणि न्याय्य असायला हवी; ज्यामध्ये सर्वांसाठी संधी निर्माण होतील.

राज्यपाल म्हणाले, दीर्घकाळापर्यंत, धोरणात्मक क्षेत्रांकडे केवळ मोठ्या कंपन्या, सरकार आणि विशिष्ट संरक्षण संस्थांची मक्तेदारी म्हणून पाहिले जात असे. आज मात्र ही संधी अधिक व्यापक झाली आहे. एक लहान उत्पादन युनिट संरक्षण क्षेत्रातील पुरवठा साखळीचा भाग बनू शकते. एखादी इलेक्ट्रॉनिक्स कंपनी धोरणात्मक हार्डवेअर निर्मितीत योगदान देऊ शकते. एखादे सॉफ्टवेअर स्टार्टअप आरोग्यसेवा, शिक्षण, लॉजिस्टिक्स, प्रशासन आणि सुरक्षा या क्षेत्रांसाठी ‘एआय’ आधारित उपाययोजना विकसित करू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

भविष्याची उभारणी कोणत्याही एका क्षेत्राद्वारे नाही, तर परस्पर सहकार्यातून होईल. एचईएफ हा विविध घटकांना एकत्र आणणारा व परस्पर सहकार्याला चालना देणारा चांगला उपक्रम असून विद्यापीठे, उद्योग आणि एचईएफसारख्या संस्थांमध्ये अधिक भागीदारी होण्याची गरज आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

पुणे हे शहर दीर्घकाळापासून ज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग आणि राष्ट्रीय विचारांचे केंद्र राहिले आहे.,महाराष्ट्र आणि भारताच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे अशा संस्था आणि नेते येथे घडले आहेत. उत्पादनातील भक्कम पाया, शैक्षणिक संस्था, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता, ऑटोमोटिव्ह परिसंस्था, संरक्षण आस्थापना, संशोधन केंद्रे, औषधनिर्माण उद्योग आणि उद्योजकीय आकांक्षामुळे, धोरणात्मक क्षेत्रांसाठी एक प्रमुख केंद्र म्हणून उदयास येण्याची पुण्याची नैसर्गिक क्षमता आहे, असे राज्यपाल म्हणाले

ते पुढे म्हणाले, केवळ तंत्रज्ञानाचा वापर न करता त्याची निर्मिती करणाऱ्या, नवनवीन शोध लावणाऱ्या, स्वहितरक्षण करणाऱ्या देशांचा जग आदर करते. भारताची लोकसंख्याविषयक ताकद, बाजारपेठेचा विस्तार, सांस्कृतिक वारसा आणि तांत्रिक कौशल्य आपल्याला विशेष संधी उपलब्ध करून देतात.

आपल्याला केवळ आकांक्षा बाळगून चालणार नाही, तर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतीशील व्हावे लागेल. आपण केवळ सेवा पुरवण्याऐवजी उत्पादने निर्माण केली पाहिजेत. केवळ व्यापारावर अवलंबून न राहता संशोधनात गुंतवणूक केली पाहिजे. नवोन्मेषकांना पाठिंबा देणे, संस्थात्मक बळकटीकरण, जोखीम घेण्यास प्रोत्साहन तसेच सचोटीसह संपत्ती निर्मितीला पाठींबा दिला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी फोरमचे सदस्य, नवउद्योजक, उद्योजक, गुंतवणूकदार, व्यावसायिक आदी उपस्थित होते.

 

0000

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘माझी वसुंधरा’ अभियानाला गती लोकसहभागातून पर्यावरण संवर्धनाचा निर्धार प्रत्येक विभाग व नागरिकांना ई-शपथ घेण्याचे आवाहन

महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना – निवासी आयुक्त श्वेता सिंघल

क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर–हैदराबाद महामार्गावर लामजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन …

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस**पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न*

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील लालबाग येथून लालबागचा राजा राजा गणेश उत्सव सोहळ्याचे गणपती बाप्पाचे दर्शन घ्या थेट पहा लाईव्ह प्रक्षेपण-: https://vishwatmaklokswamivarta.com/ आपल्या या विश्वात्मक लोक स्वामी वार्ता वेब पोर्टलवर 24 तास आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ शकता चला तर भेट द्या –

vishwatmaklokswamivarta

लातूर शहर महानगरपालिका निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta