vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा २ लाख रुपये करणार – मंत्री अतुल सावे ️ भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांचे अभिवादन

राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेची मर्यादा २ लाख रुपये करणार – मंत्री अतुल सावे, भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांचे अभिवादन

पुणे, प्रतिनिधी : समाजातील विविध घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 2 लाख रुपये करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, अशी घोषणा मंत्री श्री. सावे यांनी यावेळी केली. भिवडी येथे राजे उमाजी नाईक यांच्या जन्मस्थळी त्यांच्या 235 व्या जयंतीनिमित्त अभिवादन केल्या नंतर जाहीर कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार रामराव वडकुते, जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे, कर्नाटकचे प्रसन्न नंदपुरी महास्वामी महाराज, माजी आमदार संजय जगताप, शहाजी बापू पाटील तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले, राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून रामोशी, बेडर आणि वाल्मिकी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. समाजातील मुला-मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी इतर मागास बहुजन विकास विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे 76 वसतिगृहे सुरू करण्यात आली असून, त्यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच 31 ऑगस्ट हा दिवस ‘भटके विमुक्त दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या 75 करण्यात आली असून, लवकरच 100 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील 980 आश्रमशाळांमध्ये सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांना डिजिटल वर्ग, सौरऊर्जा, वॉशिंग मशीन यांसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आधार योजनेंतर्गत धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येत असून, महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करून देण्यात येत आहे. वनार्टीअंतर्गत सहा आणि इतर मागास बहुजन विकास विभागांतर्गत 14 आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

समाजातील युवक, महिला आणि उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळामार्फत 25 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आणि गट कर्ज व्याज योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा अधिकाधिक लाभ घेऊन युवकांनी व महिलांनी उद्योजकतेकडे वळावे, असे आवाहन मंत्री श्री. सावे यांनी केले. गोपाळ समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रज्वलित केलेली स्वराज्याची ज्योत आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मनात ठेवून राजे उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला. समाज आणि मातृभूमीसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रामोशी समाजाला शौर्य आणि पराक्रमाची मोठी परंपरा असून, स्वराज्याच्या काळात हा समाज छत्रपती शिवाजी महाराजांसाठी डोळे आणि कान म्हणून कार्यरत होता. आजही सर्व समाजांनी एकजुटीने पुढे जाण्याची गरज आहे.

राज्यातील सर्व समाजघटकांना समान न्याय देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, विविध समाजांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे. रामोशी समाजाच्या विकासासाठीही योग्य तो न्याय देण्यात येईल. दिवे येथे उभारण्यात येणारे राजे उमाजी नाईक यांचे राष्ट्रीय स्मारक भव्य-दिव्य स्वरूपात साकारण्यात येईल, अशी ग्वाही श्री. भोसले यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चित्रफिती द्वारे संदेश,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संदेशातून राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला अभिवादन केले. देशाच्या इतिहासात रामोशी समाजाचे योगदान अनन्यसाधारण असल्याचे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि मातृभूमीच्या रक्षणासाठी या समाजाने जवळपास चारशे वर्षे परकीय सत्तेविरुद्ध संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात बहिर्जी नाईकांसारख्या शूर योद्ध्यांनी आणि पुढे इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्राच्या मातीत राजे उमाजी नाईक यांनी राष्ट्रभक्तीची तेजस्वी ज्योत प्रज्वलित ठेवली.

राजे उमाजी नाईक हे केवळ आद्य क्रांतिकारक नव्हते, तर धैर्य, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक होते. त्यांच्या विचारांमध्ये स्वराज्याची आस होती. इंग्रज सत्तेला आव्हान देत त्यांनी सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये स्वातंत्र्याची मशाल पेटवली. अवघ्या 41 व्या वर्षी त्यांनी मातृभूमीसाठी प्राणार्पण केले. त्यांचे जीवन आणि कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

समाजाच्या मागणीनुसार राज्य शासनाने राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील तरुणांनी केवळ नोकरीच्या शोधात न राहता नोकऱ्या निर्माण करणारे उद्योजक व्हावे, यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करत आहे. राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘क्रांतिवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार’ आणि त्यांच्या स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाजासमोरील अडचणींचे संधीत रूपांतर करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात नमूद केले.

या कार्यक्रमात जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कारांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, शहाजी बापू पाटील आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलत शितोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

बोखारा ग्रामपंचायतीतील  आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

महाराष्ट्र राजभवन येथे मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यांचा राज्य स्थापना दिवस साजरा..

vishwatmaklokswamivarta

27 ते 30 सप्टेंबर कालावधीत पाठ्यपुस्तक मंडळांची सर्व व्यवहार बंद

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थ विरोधी प्रबोधनासाठी स्पर्धेत सहभागासाठी 8 मार्च मुदत

गायमुख ते फाउंटन रस्ता वाढविण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा महाराष्ट्र अधिक आनंदी, समृद्ध, प्रगतिशील होवो; उपमुख्यमंत्र्यांचे विघ्नहर्ता गणरायाचरणी साकडे