कामगिरीला मान्यता, गुणवत्तेला संधी; सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य
कामगिरीला मान्यता, गुणवत्तेला संधी; सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन-मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य…
मुंबई, प्रतिनिधी : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरी आधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे कार्यनियोजन, भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळी केला जाणार आहे.
या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात सेवाज्येष्ठतेसोबतच प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना महत्त्व मिळणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुढील संधी देण्याची व्यवस्था निर्माण होणार असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासही मदत होणार आहे.
तीन वर्षांच्या कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती अद्ययावत करून त्यांचे गुणांकन केले जाणार आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या गुणांकनानुसार अधिकाऱ्यांचे अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. दरवर्षी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे
रुग्णसेवेपासून डिजिटल कामकाजापर्यंत ११ कसोट्या,अधिकाऱ्यांचे गुणांकन करताना केवळ कागदोपत्री कामकाजाचा विचार न करता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. लोकाभिमुखता, तक्रार निवारण, नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण आणि संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि CSR निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे. आरोग्य संस्थांमधील आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाहीही गुणांकनाचा भाग असेल.
अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार व अपघातांच्या काळातील कामगिरीलाही महत्त्व दिले जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रमांची अंमलबजावणी, शासनाच्या विशेष अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र, पॅलेटिव्ह केअर अभियान आणि कर्करोगमुक्त महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांतील योगदानाचाही विचार केला जाणार आहे.