vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांतील भाविकांची संख्या लक्षात घेऊन तयार करावा – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, द प्रतिनिधी : पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंढरपूर कॉरिडॉरचा आराखडा पुढील ५० वर्षांचा विचार करून तयार करावा. आषाढी व कार्तिकी वारीसह सर्व एकादशी आणि वर्षभरातील भाविकांची संख्या विचारात घेऊन गर्दीचे नियोजन, दर्शन व्यवस्था आणि आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

पंढरपूर कॉरिडॉरच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी प्रीतम कुंटला, संग्राम पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, यंदाच्या आषाढी वारीत सुमारे ३२ लाख वारकरी पंढरपुरात दाखल झाले होते. यावेळी दर्शनाची रांग किमान २२ किलोमीटरपर्यंत गेली होती. सद्यस्थितीत पंढरपूर शहराची ३० ते ३५ लाख भाविकांची गर्दी हाताळण्याची क्षमता नाही. त्यामुळे प्रस्तावित कॉरिडॉरच्या माध्यमातून ही क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. आषाढी आणि कार्तिकी वारीच्या कालावधीत दर्शन रांगेत किमान दोन लाख भाविक सामावू शकतील, अशी व्यवस्था विकसित करावी.

राज्य शासनाने पंढरपूर कॉरिडॉरसाठी जवळपास चार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दर्शन मंडपासाठी मंजूर करण्यात आलेल्या १२९ कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेले कामही कॉरिडॉरच्या एकत्रित आराखड्यात समाविष्ट करावे. दर्शन मंडपात भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन दर्शन रांगेची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.

कॉरिडॉरअंतर्गत नवीन इमारती किंवा अन्य बांधकामे करताना कोणत्याही इमारतीची किंवा स्ट्रक्चरची उंची श्री विठ्ठल मंदिराच्या मुख्य शिखरापेक्षा अधिक असू नये, याची काळजी घ्यावी. चंद्रभागा नदीकाठचा वाळवंट परिसर हा भाविकांच्या श्रद्धेचा महत्त्वाचा भाग आहे. वारीच्या काळात हजारो भाविक या ठिकाणी पूजा, भजन आणि विठ्ठल आराधना करतात. त्यामुळे वाळवंटाचा विकास करताना मूळ वाळवंटाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच चंद्रभागा नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना अयोध्येतील शरयू नदीवरील घाटांच्या धर्तीवर घाटांची निर्मिती करावी, अशी सूचनाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

पंढरपूर कॉरिडॉरच्या अनुषंगाने दोन खासगी आर्किटेक्चर एजन्सींनी बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण केले. या सादरीकरणानंतर त्यांनी संबंधित एजन्सींना भाविकांची भविष्यातील वाढती संख्या, दर्शन व्यवस्था, सुरक्षितता, धार्मिक परंपरा आणि शहराच्या पायाभूत सुविधांचा समन्वय साधून आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.

 

००००

संबंधित पोस्ट

लातूर येथे 25 मार्च रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा*

व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करा-रोहयो मंत्री भरत गोगावले· वि6भागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश

जिल्ह्यात इंधनाचा सुरळीत पुरवठा राखत समानतेने इंधन वाटप करा- जिल्हाधिकारी पंकज आशिया जिल्हाधिकारी कार्यालयात पेट्रोल, डिझेल पुरवठ्याबाबत आढावा बैठक संपन्न

विमुक्त, भटक्या व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा*

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर

मनोज जरांगे पाटील यांची गोदावरी इंटरियरच्या कार्यालयाला सदिच्छा भेट उबाळे पाटील परिवाराच्या वतीने त्यांचे उत्साहात स्वागत

vishwatmaklokswamivarta