vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणी व चारा टंचाई निवारणासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव चारा लागवड, मुरघास निर्मिती आणि जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

पाणी व चारा टंचाई निवारणासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव,  चारा लागवड, मुरघास निर्मिती आणि जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईची परिस्थिती लक्षात घेता पशुधनासाठी आतापासूनच चाऱ्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. केंद्र पुरस्कृत ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देऊन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारा लागवड करावी. संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनासह सर्व घटकांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीटंचाई व चारा व्यवस्थापनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह जलसंधारण, मृद व जलसंधारण, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत आगामी काळातील संभाव्य पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पशुसंवर्धन विभागामार्फत चारा लागवडीसाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. या बियाण्यांची प्रत्यक्ष पेरणी झाली आहे किंवा नाही, याची माहिती कृषी सहाय्यक व तलाठ्यांमार्फत संकलित करावी. चारा लागवड झालेल्या क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करावी. ग्रामस्तरावर चारा लागवडीचे नियोजन करून भविष्यात टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

खरीप हंगामात पावसाची झालेली तूट आणि त्याचा पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम लक्षात घेता चारा व्यवस्थापनाला प्राधान्य देण्याची गरज आहे. खरीप पिकांची काढणी झाल्यानंतर शेतात शिल्लक राहणारे सोयाबीनचे कुटार, तुरीचे कुटार तसेच अन्य पिकांचे अवशेष संकलित करून त्यांचा पशुखाद्य म्हणून वापर करावा. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी पशुपालकांना मार्गदर्शन करावे. चारा संवर्धन, मुरघास निर्मिती, चाऱ्याची योग्य साठवणूक आणि पीक अवशेषांचे पोषणमूल्य वाढविण्याबाबत प्रशिक्षण व जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.पशुधनाची संख्या आणि उपलब्ध चाऱ्याचा साठा यांचा विचार करून भविष्यातील गरजेनुसार नियोजन करावे. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात ज्वारीसह अन्य चारा पिकांची लागवड करावी. आगामी काळात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची वेळ येऊ शकते. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच आवश्यक पूर्वतयारी करावी, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी दिले.

जलसंधारणाच्या कामांना गती द्या : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तालुकास्तरावर विविध विभागांनी समन्वयाने जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. नद्यांचे खोलीकरण, तलावांतील गाळ काढणे, नाले खोलीकरण, पांदण रस्त्यांची निर्मिती, शेततळ्यांची निर्मिती तसेच माथा ते पायथा जलसंधारणाची कामे यांचे सूक्ष्म नियोजन करावे. उपलब्ध योजनांच्या माध्यमातून ही कामे प्रभावीपणे राबवून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात अडविणे व जमिनीत जिरविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा यंत्रणा सज्ज ठेवा : जिल्ह्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर असल्याने सर्व विभागांनी सजग राहून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. जिल्ह्यात उभारण्यात आलेले पाणी शुद्धीकरण (फिल्टर) प्लांट स्वच्छ करून कार्यान्वित स्थितीत ठेवावेत. या केंद्रांवरील पाणीपुरवठा आणि वीजपुरवठ्याच्या अनुषंगाने आवश्यक नियोजन करावे. तसेच इलेक्ट्रिशियनची उपलब्धता सुनिश्चित करून पाणीपुरवठा यंत्रणेत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना, विविध विभागांच्या योजना आणि नागरिकांसाठी उपलब्ध सुविधांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागृती करावी. शेतकरी आणि नागरिकांना शासनाच्या उपाययोजनांची माहिती वेळेत मिळेल, यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक विभागाने जबाबदारीने काम करावे. पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारण, चारा लागवड आणि उपलब्ध संसाधनांचे योग्य व्यवस्थापन या बाबींना प्राधान्य देऊन आगामी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

0000

 

संबंधित पोस्ट

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील उर्वरित पात्र लाभार्थ्यांसाठी विशेष अभियान राबवावे – मंत्री आदिती तटकरे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा आढावा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्व ९८८ मिथेनॉल परवानेधारक संस्थांच्या तपासण्या फास्ट ट्रॅकवर; २२६ तपासण्या पूर्ण; ५१ संस्था बंद

टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांतील सुविधा अधिक सक्षम करणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल एकाच दिवशी 778 ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी

प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी साधला संवाद..