vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बालविवाहमुक्त अमरावती जिल्ह्यासाठी प्रशासनाचा पुढाकार ; 27 नोव्हेंबरपर्यंत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाधिकारी यांचे सर्व विभागप्रमुखांना निर्देश शाळा, ग्रामपंचायती, महिला बचत गट व पोलीस यंत्रणांचा सहभाग

बालविवाहमुक्त अमरावती जिल्ह्यासाठी प्रशासनाचा पुढाकार ; 27 नोव्हेंबरपर्यंत विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन जिल्हाधिकारी यांचे सर्व विभागप्रमुखांना निर्देश शाळा, ग्रामपंचायती, महिला बचत गट व पोलीस यंत्रणांचा सहभाग

 

 अमरावती, प्रतिनिधी :बालविवाहाची प्रथा पूर्णपणे बंद करून समाजात बालविवाहमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासनाच्या वतीने 18 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत ‘बालहक्क सप्ताह’ आणि ‘बालविवाह निर्मूलन अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.

 बालविवाह ही बालकांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी गंभीर सामाजिक समस्या असून बालकांच्या शिक्षण,आरोग्य, सुरक्षितता व सर्वांगीण विकासावर त्याचे विपरीत परिणाम होतात. संयुक्त राष्ट्र महासभेने 27 नोव्हेंबर हा दिवस ‘बालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिन’ म्हणून घोषित केला आहे. या दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे, बालविवाहाचे दुष्परिणाम समजावून सांगणे आणि बालविवाह रोखण्यासाठी समाजाचा सक्रिय सहभाग मिळविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

  या अभियानामध्ये शिक्षण विभागामार्फत शाळा व महाविद्यालयांमध्ये बालविवाह निर्मूलन विषयावर जनजागृती, विद्यार्थ्यांच्या रॅली, सामूहिक प्रतिज्ञा, निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. आरोग्य विभागामार्फत किशोरी सभा, किशोरवयीन आरोग्य व पोषणविषयक मार्गदर्शन तसेच बालविवाहामुळे माता व बालकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

     पंचायत विभागामार्फत ग्रामपंचायत स्तरावर विशेष बैठका, दवंडी व ग्रामसभांमध्ये बालविवाहमुक्त गावाचा ठराव घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभागामार्फत अंगणवाडी केंद्रांमध्ये किशोरी सभा, ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या बैठका व पालकांचे समुपदेशन आयोजित केले जाणार आहे. तसेच उमेद अभियान व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या बैठकीत बालविवाह निर्मूलनाबाबत जनजागृती व सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात येणार आहे.

           पोलीस विभागामार्फत पोलीस ठाणे स्तरावर बालविवाह प्रतिबंधक जनजागृती बैठका आयोजित करून पोलीस पाटील व ग्रामस्तरीय यंत्रणांच्या माध्यमातून नागरिकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याची माहिती देण्यात येणार आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास तातडीने प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

     जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन यांच्या माध्यमातून विविध विभागांशी समन्वय साधून बालविवाहाची संभाव्य प्रकरणे शोधणे,प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तसेच बालकांच्या संरक्षणासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 बाबत जनजागृती करण्यात येणार आहे.27 नोव्हेंबर रोजी विशेष जनजागृती अभियानबालविवाह व सक्तीचे विवाह निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त 27 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात विशेष जनजागृती कार्यक्रम, सामूहिक प्रतिज्ञा, महिला बचत गटांच्या बैठका, ग्राम बाल संरक्षण समित्यांच्या माध्यमातून जनजागृती व विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

     या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक गाव, प्रत्येक शाळा आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत बालविवाह निर्मूलनाचा संदेश पोहोचविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. बालविवाह रोखणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे पालक, शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचत गट, सामाजिक संस्था व नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 किंवा संबंधित पोलीस यंत्रणेशी संपर्क साधावा.

  जिल्ह्यातील सर्व विभागांनी राबविलेल्या कार्यक्रमांचा छायाचित्रांसह सविस्तर अहवाल दिनांक 2 डिसेंबर 2026 पर्यंत जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात माय मराठीचा जागर!मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज- ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार डॉ. शेषराव मोहिते,मातृभाषेच्या सन्मानासाठी सर्वजण पुढाकार घेऊया- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे..

माओवाद विरोधातील लढ्यात महाराष्ट्र पोलिसांनी निर्णायक यश-किमान तीन वर्षे सी-६० मध्ये सेवा बजावणाऱ्या जवानांना राज्य शासनामार्फत विशेष ‘सी-६० पदक’ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

vishwatmaklokswamivarta

शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत जीवनाची दिशा देतात –पालकमंत्री जयकुमार रावल दोंडाईचा येथे २७ आदर्श शिक्षकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहर जिल्ह्यात ‘बाल अधिकार सप्ताह २०२६’ चा उत्साहात शुभारंभ; प्रमुख रेल्वे स्थानकांवर बालकांसोबत बालदिन साजरा

vishwatmaklokswamivarta