ठाणे, प्रतिनिधी: १४७ कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या शेवटच्या एक तासात ८९ ते ९० हजार मते वाढल्याचे वृत्त काही डिजिटल प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाले असून, ते पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.
या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह सर्व संबंधित कागदपत्रे, अहवाल आणि भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या नोंदींची सखोल तपासणी करून त्यांनी वस्तुस्थिती प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. या प्रकरणात संबंधित डिजिटल वाहिनीने ‘अॅनेक्सर ४४’ (Annexure 44) मधील दर दोन तासांनी सादर केल्या जाणाऱ्या प्रोग्रेसिव्ह अहवालाचा चुकीचा संदर्भ घेतल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात त्या दिवशी सकाळी ७ ते ९ या वेळेत २४ हजार २७० (७.१५ टक्के), सकाळी ७ ते ११ या वेळेत ६१ हजार ८५७ (१८.२२ टक्के), सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत १ लाख ९ हजार (३२ टक्के), तर सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत १ लाख ५१ हजार ४४० (४४.६ टक्के) इतके मतदान नोंदवले गेले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत या मतदारसंघात १ लाख ८९ हजार ३४२ (५५.७७ टक्के) मतदान झाले होते, तर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदान २ लाख ३ हजार (५९.८५ टक्के) इतके झाले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत केवळ १ लाख १३ हजार (३३ टक्के) मतदान झाले होते, असा केलेला दावा पूर्णपणे निराधार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दुपारी १ वाजेपर्यंतच मतदानाने १ लाख ९ हजारांचा टप्पा ओलांडला होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५५.७७ टक्के मतदान झाले होते आणि सायंकाळी ६ वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना नियमांनुसार रिव्हर्स टोकन देऊन त्यांचे मतदान पूर्ण करून घेतल्यानंतर ५ ते मतदान संपेपर्यंत सुमारे १३ हजार मतांची भर पडली. ही आकडेवारी जिल्ह्यातील इतर मतदारसंघांमधील ५७ टक्क्यांच्या सरासरी मतदानाशी सुसंगत आहे.
मतदानाच्या दिवशी प्रत्येक दोन् तासांनी ‘सीईओ’ (CEO) कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांना अधिकृत आकडेवारी दिली जात होती. याबाबत या आकडेवारीच्या अनुषंगाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून विहित नमुन्यात विविध प्रसारमाध्यमांना वेळोवेळी संबंधित आकडेवारी दिली जात होती. तसेच, प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी उपस्थित असतात, मतदान संपल्यानंतर त्यांना ‘१७ सी'(नोंद झालेल्या मतांचा हिशोब) ही प्रत दिली जाते, ज्यामध्ये एकूण मतदानाची नोंद असते. दुसऱ्या दिवशी निवडणूक निरीक्षक आणि सर्व उमेदवारांसमोर होणाऱ्या छाननी प्रक्रियेदरम्यानही या आकडेवारीवर कोणीही आक्षेप घेतला नव्हता.
त्यामुळे नागरिकांनी आणि प्रसारमाध्यमांनी अपुऱ्या व चुकीच्या संदर्भांवर आधारित माहितीवर विश्वास ठेवू नये, याबाबत जिल्हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधून अधिकृत माहिती प्राप्त करून घ्यावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५.०० वाजेनंतर झालेल्या मतदानाच्या आकडेवारीबाबत प्रोग्रेसिव रिपोर्ट तपासणी केली असून तपासणीअंती 89 हजार मते वाढल्याबाबतची टिपण्णी वस्तुस्थितीशी सुसंगत नसून पूर्णतः चुकीची आहे.