*प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना नाव नोंदणीची पुन्हा संधी; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय*
गडचिरोली, प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या ६ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या निर्देशानुसार, विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-२०२६ (SIR) अंतर्गत ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होऊ शकली नाहीत, अशा मतदारांना अंतिम मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी प्रशासनाकडून आणखी एक संधी देण्यात आली आहे.अनुपस्थित (Absent), स्थलांतरित (Shifted), मृत (Dead) व दुबार (Duplicate) अर्थात ‘ASDD’ या प्रवर्गात नोंद झाल्यामुळे ज्या मतदारांचे गणना प्रपत्र प्राप्त झाले नव्हते आणि ज्यांची नावे प्रारूप यादीतून वगळली गेली आहेत, त्यांच्यासाठी ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व संबंधित मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदवून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहेमतदारांसाठी महत्त्वाच्या सूचना आणि प्रक्रिया:
याद्यांची प्रसिद्धी: ‘ASDD’ प्रवर्गातील मतदारांच्या मतदान केंद्रनिहाय याद्या संबंधित मतदान केंद्रे, ग्रामपंचायत, नगर परिषद व नगर पंचायत कार्यालयांच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तसेच, या याद्या मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावरही PDF स्वरूपात उपलब्ध असतील.
अर्ज सादर करण्याची पद्धत: संबंधित मतदारांनी मतदार नोंदणी अधिकारी (ERO), सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याशी संपर्क साधून गणना प्रपत्र पुन्हा सादर करावे. हे प्रपत्र प्रत्यक्ष किंवा WhatsApp, ई-मेल, SMS आणि ‘ECINET App’ द्वारेही सादर करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जुन्या EPIC क्रमांकाचा वापर करून आयोगाच्या संकेतस्थळावरूनही हे प्रपत्र डाउनलोड करता येईल.
निवासस्थान बदलले नसल्यास: मतदाराने घर बदलले नसल्यास भरलेले व स्वाक्षरी केलेले गणना प्रपत्र ‘परिशिष्ट-B’ मधील घोषणापत्रासह संबंधित ERO, AERO किंवा BLO यांच्याकडे जमा करावे.राज्यांतर्गत स्थलांतर झाल्यास: राज्यांतर्गत पत्ता बदलला असल्यास नवीन पत्ता व विधानसभा मतदारसंघाचा तपशील नमूद करून ‘परिशिष्ट-C’ मधील घोषणापत्र, गणना प्रपत्र आणि पत्त्याच्या पुराव्यासह नवीन मतदारसंघाच्या ERO/AERO यांच्याकडे सादर करावे. यासाठी स्वतंत्रपणे ‘नमुना ८’ भरण्याची गरज नाही.बेघर मतदारांसाठी तरतूद: ज्या बेघर मतदारांकडे पत्त्याचा कोणताही पुरावा नाही, त्यांच्या बाबतीत BLO यांचा क्षेत्र पडताळणी अहवाल ग्राह्य धरला जाणार आहे.
BLO मार्फत विशेष संपर्क मोहीम:या प्रक्रियेसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी जाऊन कुटुंबीय, शेजारी आणि उपलब्ध संपर्क क्रमांकांच्या मदतीने मतदारांशी संपर्क साधणार असून, यात राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांचेही (BLA) सहकार्य घेतले जाणार आहे. याशिवाय, मतदारांना ‘ECINET App’ आणि निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील ‘Book a Call with BLO’ या सुविधेद्वारे थेट अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. प्राप्त अर्जांची योग्य पडताळणी करून पात्र मतदारांचा समावेश अंतिम मतदार यादीत केला जाईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राहूल जाधव यांनी दिली आहे.