
‘रामायण’ चित्रपटावर हिंदु जनजागृती समितीचा तीव्र आक्षेप *रावणाचे उदात्तीकरण, मूळ रामायणाची मोडतोड आणि ‘कम्युनिस्ट अजेंडा’ पसरवणारा चित्रपट आम्ही खपवून घेणार नाही !* – हिंदु जनजागृती समिती
राज्य प्रतिनिधी- नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘रामायण’ चित्रपटातील काही दृश्यांमधून महर्षि वाल्मिकी लिखित रामायणातील मूळ कथेत ‘लेखन स्वातंत्र्या’च्या नावाखाली जाणीवपूर्वक बदलण्यात आले आहेत. यामध्ये रावणाचे अवाजवी उदात्तीकरण, अनेक प्रसंगात विपर्यास, लक्ष्मणाचे अवमूल्यन आणि प्रभु श्रीराम-लक्ष्मण यांच्या पराक्रमाशी विसंगत चित्रण अशा अनेक गाेष्टी अत्यंत संतापजनक व आक्षेपार्ह आहेत. ‘रामायण’ हा कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. या चित्रपटात ‘कम्युनिस्ट अजेंडा’ राबवल्याचेही दिसून येते. त्यामुळे रामाऐवजी रावणाचे महिमामंडन होणार असेल, तसेच आमच्या धर्मग्रंथांतील संदर्भांची मोडतोड होणार असेल, तर आम्ही या चित्रपटाच्या येणाऱ्या दुसऱ्या भागाला कडाडून विरोध करू, असा इशार देत ‘कम्युनिस्ट नॅरेटिव्ह पसरवणारा हा चित्रपट सनातनी हिंदूंनी पाहू नये’, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक *श्री. सुनील घनवट* यांनी पत्रकार परिषदेत केले. आज ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त झालेल्या पत्रकार परिषदेला सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते *श्री. अभय वर्तक* आणि हिंदु जनजागृती समितीचे मुंबई प्रवक्ते *श्री. सतीश कोचरेकर* हेही उपस्थित होते.
या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक म्हणाले की, जे रामायणात आहे, तसेच चित्रण होणे अभिप्रेत आहे. मात्र अनेक प्रसंगांत मूळ रामायणातील प्रसंगांची मोडतोड केली आहे. हे स्वीकारार्ह नाही. आज देशात रामभक्त पंतप्रधान आणि रामाला आदर्श मानणारे सरकार असतांना अशा कलाकृतींच्या माध्यमातून इतिहासाची मोडतोड होत असेल, तर ते दुर्दैवी आहे. श्री. घनवट पुढे म्हणाले की, ‘सेन्सॉर बोर्ड’ हे हिंदु सोडून सर्व अन्य धर्मियांच्या भावनांची काळजी घेणारे असून हिंदूंच्या धार्मिक भावनांची त्यांना आजिबात किंमत नाही. ‘सेन्सॉर बोर्डा’ने कोणत्याही धर्मग्रंथांवर आधारित चित्रपटांना प्रमाणपत्र देतांना त्याचा पुरेपूर अभ्यास करायला हवा, असेही घनवट यांनी सांगितले.
*या चित्रपटातील आमचे प्रमुख आक्षेप पुढीलप्रमाणे आहेत :-**१.* प्रत्यक्षात ऋषिमुनींचे आश्रम नष्ट करणाऱ्या पापी रावणाला या चित्रपटात गरिबांना सोन्याची घरे देणारा, शोषितांचा तारणहार म्हणून रंगवले आहे. रावण हा राक्षसांचा राजा होता. राक्षस हे शोषित नसून अत्याचारी होते. या चित्रपटात शोषित समाजाला न्याय मिळवून देणारा अर्थात कम्युनिस्टांच्या विचारधारेवर आधारित रावण दाखवण्यात आला आहे.
*२.* माता सीतेचे हरण करणारा, अनेक महिलांवर अत्याचार केल्याने ‘परस्त्रीला स्पर्श केल्यास भस्म होण्याचा शाप मिळालेला’ रावणाला एका दासीला छेडल्यामुळे शूर्पणखेचा पती विद्युतजिव्हाला मारत ‘महिलांच्या सन्मानाचा रक्षक’ दाखवण्यात आले आहे. हा देखील कम्युनिस्ट अजेंडाच आहे.
*३.* चित्रपटात शूर्पणखेला ती रामाकडे केवळ ‘लग्नाचा प्रस्ताव’ घेऊन आली होती आणि केवळ त्यावरून लक्ष्मणाने तिचे नाक कापले, असे दाखवले आहे. त्याहून संतापजनक म्हणजे या प्रसंगानंतर चित्रपटात माता सीता लक्ष्मणाला ‘एका स्त्रीच्या रूपाचा भंग करण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, असे खडसावते. तसेच या प्रसंगाबद्दल प्रभू श्रीराम लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापल्याच्या कृतीबद्दल खर-दूषण या राक्षसांकडे क्षमायाचना करताना दाखवले आहेत. हे अत्यंत आक्षेपार्ह आहेत. जे रामायणात घडलेच नाही, ते उगाचच तथाकथित स्त्रीवादी चळवळीच्या भूमिकेचा प्रचार करण्यासाठी घुसडले आहे.
*४.* खर-दूषण आणि त्यांचे १४ हजार राक्षस, तसेच ताडका यांच्याशी युद्ध करताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण राक्षसांच्या सैन्यापासून पळताना दाखवले आहेत. वस्तुत: विष्णूचा अवतार असलेले भगवान श्रीराम आणि लक्ष्मण हे अजेय योद्धे होते, त्यांनी रणांगणातून कधीही पळ काढणे तर दूर माघारही घेतलेली नाही. एकीकडे रावण हजारो सेनेसमोर एकटा शस्त्रांशिवाय लढतांना, तसर श्रीराम राक्षसांपासून पळतांना दाखवून रावणाचे उदात्तिकरण आणि प्रभू श्रीरामांचा अवमानच केला आहे.
*५.* लक्ष्मणाच्या आदर्श व्यक्तिरेखेचे जाणीवपूर्वक अवमूल्यन करण्यात आले आहे. चित्रपटात लक्ष्मणाला सतत उद्धट, संतापी आणि वर्तमानातील एखाद्या ‘कॉमेडी’ पात्राप्रमाणे संवाद करतांना दाखवले आहे. अत्यंत नम्र आणि निष्ठावान असलेल्या लक्ष्मणाला श्रीराम, भगवान परशुराम आणि अन्य पूजनीय ऋषींशी उपरोधिक भाषेत बोलताना दाखवले आहे. ऋषी विश्वामित्र आणि अगस्त्य ऋषींनी रामाप्रमाणे मीही राक्षसांचा वध केला आहे, तर मलाही अस्त्रविद्या द्यावी, असे म्हणतांना दाखवले आहे. प्रत्यक्षात वाल्मिकी रामायणानुसार विश्वामित्रांनी श्रीराम-लक्ष्मण दोघांनाही ‘बला-अतिबला’ विद्या दिली होती. त्याग आणि निष्ठा यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेल्या लक्ष्मणाला असे दाखवणे, ही धर्मग्रंथांत दिलेल्या ज्ञानाची केलेली मोडतोड अत्यंत संतापजनक आहे.
*६.* या चित्रपटात माता सीता इतर राक्षसांशी स्वतः लढताना दाखवली आहे; पण रावण जेव्हा तिचे अपहरण करतो तेव्हा ती कोणताच प्रतिकार करत नाही, हा मोठा विरोधाभास आहे. माता सीता युद्ध करते, असे वाल्मिकी रामायणात कुठेही उल्लेख नाहीत.
*७.* मूळ रामायणानुसार सीता-स्वयंवरामध्ये रावणही होता आणि त्याला शिवधनुष्य उचलता आले नाही, त्यामुळे तो खजिल झाला होता. ही वस्तुस्थिती असतांना चित्रपटात रावणाला या प्रसंगात दाखवलेलेच नाही. श्रीरामाच्या सामर्थ्यापुढे रावणाला कमी दाखवणे, हे बहुदा निर्मात्यांना त्यांच्या कम्युनिस्ट अजेंड्यात न बसणारे असावे.
*श्री. घनवट* पुढे म्हणाले की, अशा धार्मिक गोष्टींची मोडतोड न होता चित्रपट बनवले गेले आहेत कि नाही, हे तपासण्याची सर्वस्वी जबाबदारी सेन्सॉरबोर्डाकडे असते. परंतु त्यांनी त्यांचे काम इतर वेळे्प्रमाणेच नीट केलेले नाही. जर ‘मेसेंजर ऑफ गॉड’ला मुसलमानांचा विरोध होतो, म्हणून त्या चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी घातली जाते; ‘द दा विन्सी कोड’ या चित्रपटाला ख्रिस्त्यांचा विरोध होतो, म्हणून गोवा आणि केरळ येथे या चित्रपटावर बंदी घातली जाते. एवढंच नव्हे तर ‘कमाल धमाल मालामाल’ या चित्रपटात ‘फादर एका कुत्र्याचे लग्न लावतो’ या प्रसंगामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आठवड्याने ख्रिस्ती समाज विरोध करतो आणि सेन्सॉर बोर्ड तो चित्रपट मागे घेऊन सुधारणा करून प्रदर्शित करतो, तर हिंदूंच्या धर्मभावनांविषयी सेन्सॉर बोर्ड इतके असंवेदनशील का आहे, हा आम्हाला प्रश्नच आहे.
या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यांच्या संदर्भात आम्ही निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्ड यांना सांगू इच्छितो की, या चित्रपटाप्रमाणेच त्याच्या दुसऱ्या भागातही मोडतोड झालेली आढळली, तर देशभरात रस्त्यावर उतरून या चित्रपटाला आम्ही कडाडून विरोध करू. दुसरा भाग प्रदर्शित होण्यापूर्वी यांनी हिंदु संत आणि रामायणाचे अभ्यासक असलेल्यांना चित्रपट दाखवून प्रदर्शित करावा, असेही आवाहन समस्त हिंदु संघटनांच्या वतीने करत असल्याचे श्री. अभय वर्तक यांनी या वेळी सांगितले. तसेच रामभक्त सरकारनेही रामाची निंदा करणाऱ्या चित्रपटाविषयी भूमिका घ्यावी, असे आवाहनही सरकारला केले आहे.*श्री. सुनील घनवट* ,
राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती, महाराष्ट्र आणि छत्तीसगड.



