
जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026-27 मध्ये तरुणाईचा उत्साहात कलाविष्कार
ठाणे प्रतिनिधी): क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2026-27 चे उद्घाटन व आयोजन रविवार, दि.22 नोव्हेंबर 2026 रोजी सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती सुवर्णा बारटक्के यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात युवा महोत्सवाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना युवकांमधील सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे तसेच युवकांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी शासनाने हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे,असे सांगितले.
या महोत्सवाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा माहिती अधिकारी श्री. मनोज सुमन शिवाजी सानप यांच्या हस्ते संपन्न झाले तर याप्रसंगी श्रीमती सजिथा नायर, वरिष्ठ माध्यमिक विभाग प्रमुख, सेक्रेड हार्ट स्कूल, श्री प्रणव देसाई, जिल्हा युवा पुरस्कारार्थी, श्री सुनील म्हसकर युवा पुरस्कार संघटना हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. येथील विविध कला स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन आगळ्यावेगळ्या प्रकारे करण्यात आले. या स्पर्धा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सानप स्वतः देशभक्तीपर “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या प्रभावी एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण केले. श्री.सानप यांनी सादर केलेल्या या एकपात्री प्रयोगाने उपस्थित युवक, विद्यार्थी व मान्यवर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या अभिनयातून युवकांना देशभक्ती अन् समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश मिळाला. त्यांच्या या कलाविष्काराला सर्वच उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये कविता लेखन, चित्रकला, लोकगीत, लोकनृत्य, पथनाट्य आणि पीपीटी सादरीकरण अशा विविध कलाप्रकारांचा समावेश करण्यात आला होता. ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींनी या विविध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रत्येक स्पर्धेतून युवकांची सर्जनशीलता, कल्पकता, सामाजिक जाणीव आणि सांस्कृतिक वैविध्य यांचे दर्शन घडले.
जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दि.27 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित विभागीय युवा महोत्सवामधे ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व या जिल्हा युवा महोत्सवातील विजयी युवक/युवती करणार असून त्यांना विभागीय युवा महोत्सवासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण येथील व्यवस्थापन तसेच कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिल्हा युवा महोत्सवाच्या माध्यमातून युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळाली. युवकांच्या कला, कौशल्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारा हा महोत्सव उत्साहात संपन्न झाला.
00000
—



