
नवी मुंबईत ठिकठिकाणी जागतिक शौचालय दिन स्वच्छता उपक्रमांतून साजरा
नवी मुंबई प्रतिनिधी- जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कालपासूनच ‘शौचालय स्वच्छता विशेष मोहीम’ राबविण्यास सुरूवात झालेली आहे. या अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 406 सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांमध्ये व शौचालयांच्या परिसरामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल स्वच्छता करण्यात येत असून त्यासोबतच शौचालयांमध्ये आवश्यक साधनसामुग्रीची पूर्तता करण्यात येत आहे. याशिवाय शौचालय स्वच्छतेविषयी जनजागृती आणि स्वच्छताकर्मींचा सन्मान असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांना स्वच्छ व सुलभ शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका वचनबध्द असून त्याचीच परिपूर्ती या विशेष मोहीमेव्दारे करण्यात येत आहे.
कालप्रमाणेच आजही आठही विभाग कार्यालय क्षेत्रात असलेल्या सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये वाशी येथील टिळक कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने शौचालय व परिसर साफसफाई अभियान राबविण्यात आले. या माध्यमातून सार्वजनिक शौचालये व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, हा संदेश प्रसारित करण्यात आला.
अशाचप्रकारे चिंचोली उद्यान, सेक्टर ५, ऐरोली येथे शौचालय व परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परिसराचे आरोग्य जपणाऱ्या व अहोरात्र सेवा देणाऱ्या स्वच्छताकर्मींचा यावेळी सत्कार करण्यात आला. “स्वच्छता हीच सेवा! चला, आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवूया” हा संदेश फलक झळकवित देण्यात आला.
मोराज, सानपाडा येथील साधू वासवानी कॉलेज येथे स्वच्छता जनजागृती व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष स्वच्छता करण्यासोबतट विद्यार्थी व उपस्थितांना शौचालयांची नियमित स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता व सार्वजनिक स्वच्छतागृहांचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
काशिनाथ हिंदी विद्यालय, गौतमनगर, रबाळे येथेही जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात आला. स्थानिक महिला-पुरुष तसेच शौचालय सफाई कर्मचाऱ्यांना शौचालय स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले व सफाई कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती सभापती श्रीम. रंजना सुधाकर सोनवणे व माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनवणे तसेच स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.
सारसोळे बस डेपो येथील शौचालय सफाई कर्मचाऱ्यांना जागतिक शौचालय दिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आले व सफाई मोहीमेनंतर त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
एस.एस.विद्यालय, सेक्टर ४४, नेरूळ येथील शौचालय, कंपोस्ट पिट व परिसराची पाहणी करण्यात आली. स्वच्छता मोहीम राबविण्यासोबतच विद्यार्थ्यांना सार्वजनिक शौचालय, कचरा वर्गीकरण, कंपोस्टिंग, प्लास्टिक बंदी व परिसर स्वच्छता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शेल्टर असोसिएट्सच्या सहकार्याने रबाळे येथे विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न



