vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

समाजसेवेची भावना सामाजिक जाणीवेचा अविभाज्य भाग व्हावी – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

समाजसेवेची भावना सामाजिक जाणीवेचा अविभाज्य भाग व्हावी – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

मुंबई, प्रतिनिधी: समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी सेवाभावी संस्था, संघटना आणि व्यक्तींनी सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. शासनाचे प्रयत्न महत्त्वाचे असले, तरी सर्वसमावेशक आणि संवेदनशील समाजनिर्मितीसाठी सामाजिक बांधिलकीची भावना तितकीच महत्त्वाची आहे. इतरांची काळजी घेणे हे मूल्य आपल्या सामाजिक जाणिवेचा अविभाज्य भाग बनले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले.

सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मुंबईत आयोजित ‘जन गौरव पुरस्कार’ सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. या वेळी माजी मंत्री सुबोध सावजी, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राहुल सावजी, पद्मश्री सोमा घोष, ज्येष्ठ संपादक सरिता कौशिक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, पद्मश्री सोमा घोष यांनी संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. तर सरिता कौशिक यांनी पत्रकारिता आणि प्रसारमाध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आरोग्यसेवा, उद्योजकता, बँकिंग, क्रीडा, सामाजिक सेवा, संस्कृती आणि सार्वजनिक प्रशासन अशा विविध क्षेत्रांत पुरस्कारार्थींनी दिलेले योगदान समाजासाठी मोलाचे आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान केल्याने त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते आणि तरुण पिढीलाही उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. सर्व पुरस्कारार्थींचे त्यांनी अभिनंदन केले.

सपना सुबोध सावजी चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक कार्याचे कौतुक करताना राज्यपाल म्हणाले, समाजातील वंचित घटक, विशेषतः बालके आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या कल्याणासाठी ट्रस्टकडून उल्लेखनीय कार्य केले जात आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी केवळ विचारांपुरती मर्यादित न ठेवता तिचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणे, ही या संस्थेची विशेष बाब आहे.

कोविड महामारीच्या काळात देशभरातील रुग्णांना मदत करण्यासाठी ट्रस्टने २४ तास हेल्पलाइन सुरू केली होती. तसेच मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसाठी कृतज्ञतेच्या भावनेतून मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. मेहकर तालुक्यातील शेतकरी विधवांना शेतीच्या कामासाठी विनामूल्य ट्रॅक्टर उपलब्ध करून देण्याचा ट्रस्टचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे संकटग्रस्त कुटुंबांना आर्थिक स्वावलंबन आणि सन्मानाने जगण्याचे बळ मिळते, असेही राज्यपाल म्हणाले.शिर्डी येथे ८०० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारण्याचा ट्रस्टचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे समजल्याचे सांगत, हा प्रकल्प लवकरच साकार व्हावा आणि गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, अशी अपेक्षा राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी व्यक्त केली. आपल्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद म्हणजे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे होय. भारताला निःस्वार्थ सेवेची समृद्ध परंपरा लाभली असून, मानवसेवा हीच ईश्वरसेवा असल्याचा संदेश आपल्या धर्मग्रंथांनी दिला आहे. आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात करुणा आणि सामाजिक जबाबदारीची भावना जपणे आवश्यक आहे, असेही राज्यपाल म्हणाले.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते गायिका पद्मश्री सोमा घोष, पत्रकार सरिता कौशिक, कर्करोगतज्ज्ञ, डॉ. भारत भोसले, उद्योजक प्रदीप नंद, समाजसेवक चंद्रकुमार जाजू, उद्योजक डॉ. रोहित साने, बँकर रुशांक चव्हाण, अभिनेत्री क्रांती रेडकर, योग तज्ज्ञ पूनम सोळंकी, उद्योजक नासिर मनेर, उद्योजक जिग्नेश हिराणी, डॉ. आरती डोईफोडे, उद्योजक अशफाक दिवेचा, खेळाडू अम्मार मन्सुरी, सामाजिक कार्यकर्ते सोहम सावजी यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

००००००

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; तालुकास्तरीय समित्या गठीत

vishwatmaklokswamivarta

भव्य रक्तदान शिबीर व सत्संग सोहळा

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामांचाऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

आजची मोठी बातमी -पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल लागला सर्व आरोपींची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता. 20 वर्षांनी लागला निकाल…

vishwatmaklokswamivarta

मागेल त्या शेतकऱ्याला कर्ज मिळाले तरच सहकार चळवळ पुढे जाईल – मंत्री बाबासाहेब पाटील भोकरमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन वास्तूचे लोकार्पण