१४ वर्षांचा सामाजिक बहिष्कार अखेर मागे;अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे मोरे कुटुंबीयांना न्याय.
चिपळूण, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील श्री. जगन्नाथ जयसिंग मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गेल्या १४ वर्षांपासून देवदेवस्कीच्या अंधश्रद्धा व गैरसमजांतून सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला होता. अखेर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पाठपुराव्यामुळे हा बहिष्कार मागे घेण्यात आला असून, मोरे कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी करून न घेणे, सहकार्य नाकारणे, तसेच गावातील काही व्यक्ती आजारी पडल्यास त्या मोरे कुटुंबीयांच्या कथित देवदेवस्कीमुळे आजारी पडल्याचा आरोप करणे, अशा प्रकारांमुळे मोरे कुटुंबीयांना गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते.
या प्रकाराला कंटाळून मोरे कुटुंबीयांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चिपळूण शाखेकडे मदतीची मागणी केली. त्यानंतर चिपळूण अंनिसच्या पुढाकाराने मोरे कुटुंबीय आणि वहाळ गावातील ग्रामस्थ यांची बैठक सावर्डे पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आली.
या बैठकीत प्रकरणाची सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायदा आणि सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याबाबत ग्रामस्थांना माहिती देण्यात आली. देवदेवस्कीच्या नावाखाली निर्माण झालेले गैरसमज, भीती आणि अंधश्रद्धा याबाबत अंनिसच्या कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
चर्चेनंतर ग्रामस्थांनी आपली चूक मान्य केली. यापुढे श्री. जगन्नाथ मोरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही, तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा सामाजिक बहिष्कार राहणार नाही, असे ग्रामस्थांनी मान्य केले. याबाबत वहाळ ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात बहिष्कार मागे घेत असल्याचे नमूद करून, यापुढे मोरे कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, अशी हमी दिली.
या प्रकरणात अंनिसचे जिल्हाध्यक्ष तानू आंबेकर यांनी अंधश्रद्धा, गैरसमज आणि देवदेवस्कीच्या नावाने निर्माण होणारे सामाजिक शोषण याबाबत ग्रामस्थांचे प्रबोधन केले.यावेळी सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी वहाळ येथील ग्रामस्थांना कायद्याची बाजू समजावून सांगितली.
या बैठकीस सावर्डे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, स. पो. नि. कोळेकर साहेब, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या चिपळूण शाखेचे अध्यक्ष कृष्णाजी कोकमकर, कार्याध्यक्ष श्रीधर पालशेतकर, सचिन मोहिते, सुरेश जाधव, ललेश कदम, अमर जाधव, काजरोलकर आदी उपस्थित होते.0000