ठाणे प्रतिनिधी: ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिका शाळांमधील आरोग्य तपासणी शिबिरांतर्गत हिमोग्लोबिनोपॅथी चाचणीचा शुभारंभ 15 ऑगस्ट 2026 रोजी ठाणे मनपा शाळा क्र. 69, कळवा येथे करण्यात आला.
हिमोग्लोबिनोपॅथी हा अनुवांशिक रक्तविकारांचा एक महत्त्वाचा, परंतु अनेकदा दुर्लक्षित राहणारा गट. यामध्ये सिकलसेल ॲनिमिया, थॅलेसेमिया आणि हिमोग्लोबिनशी संबंधित इतर विकारांचा समावेश होतो. हे विकार पालकांकडून वारशाने मिळतात आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत.
नियमित तपासणीद्वारे (screening) लवकर निदान करणे ही हिमोग्लोबिनशी संबंधित विकारांचा भार कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी रणनीतींपैकी एक आहे. विशेषतः बालपण, किशोरवयीन अवस्था किंवा लग्नापूर्वी राबवल्या जाणाऱ्या तपासणी कार्यक्रमांमुळे अशा वाहकांची ओळख पटण्यास मदत होते, ज्यांना अन्यथा त्यांच्या अनुवांशिक स्थितीबद्दल माहिती मिळाली नसती. वेळेवर निदान झाल्यामुळे बाधित मुलांसाठी योग्य वैद्यकीय उपचार, लसीकरण, पोषणविषयक मदत आणि नियमित पाठपुरावा करणे शक्य होते, ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारते आणि आरोग्याचे परिणाम अधिक चांगले मिळतात, याच अनुषंगाने शालेय विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली.
या वेळी नगरसेविका अपर्णा साळवी, अधिष्ठाता राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा डॉ. स्वप्नाली कदम, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, डॉ.मोहित रोजेकर, जीवरसायनशास्त्र विभागप्रमुख कळवा हॉस्पिटल, URC प्रमुख मुस्ताक पठाण, रवींद्र पाटील,गटप्रमुख संतोष दळवी, CRC समन्वयक किरण लहामते, उषा फापाळे, विशेष शिक्षक प्रमिला म्हात्रे तसेच मुख्याध्यापक वैशाली प्रभू, प्रतिभा पाटील, शाबान शेख व शिक्षक उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत माध्यमिक शाळा क्र. 2, शाळा क्र. 115, 70 व 69 मधील एकूण 250 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनोपॅथी तपासणी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या वैद्यकीय पथकाद्वारे करण्यात आली.
हा उपक्रम डॉ. मिताली संचेती, उपायुक्त शिक्षण विभाग ठाणे मनपा, शिक्षणाधिकारी शेषराव बडे व गट अधिकारी संगीता बामणे आणि अधिष्ठाता डॉ स्वप्नाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.