vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

ड्रोन प्रणालीचे उड्डाण व मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील-नियंत्रण कक्षाचे दि.09 जानेवारी रोजी होणार उद्घाटन

 

ठाणे,द प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याच्या जलधीक्षेत्रात होत असलेली अवैध मासेमारी रोखण्यासाठी म.सा.मा.नि.अ.1981 (सुधारीत 2021) हा कायदा अंमलात आला आहे. या सागरी मासेमारी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता विभागाकडे असलेल्या गस्ती नौकांमार्फत गस्त घालून कार्यवाही करण्यात येत असते. गस्ती नौकेद्वारे समुद्रात गस्त घालत असताना प्रत्येक नौकेची तपासणी करणे शक्य होत नाही तसेच अनधिकृत नौकांचा पाठलाग करीत असताना त्या पळून जात असतात. अशा नौकांना पकडणे जिकरीचे होत असते. गस्ती नौकेसोबतच राज्याच्या जलधीक्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केल्यास अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांची पुराव्यासह माहिती विभागास उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. अशा नौकांवर सागरी कायद्यांतर्गत कठोरपणे कारवाई करणे सोईचे होईल.

ड्रोनचा वेग जास्त असल्यामुळे एकाच वेळेस अधिकचे क्षेत्र ड्रोनद्वारे देखरेखीखाली येण्यास मदत होणार आहे. ड्रोनचा वापर करुन मासेमारी नौकांची मॅपिंग करुन झाल्यावर अनधिकृत मासेमारी नौकांची माहिती विभागास सुलभरित्या उपलब्ध होवू शकेल, ड्रोनद्वारे राज्याच्या किनारपट्टीवरील जलधी क्षेत्र देखरेखीखाली येणार असून वापरण्यात येणारे ड्रोन हे सागरी पोलीस विभागाशी समन्वय साधून वापरण्यात येणार आहेत, जेणेकरुन सागरी सुरक्षा बळकट होण्यास देखील मदत होईल. अनधिकृत मासेमारीस आळा घालून शाश्वत मासेमारी टिकून राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सागरी सुरक्षा व सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून मासेमारीचे नियमन करण्याकरिता ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली 8 वर्ष अधिक 2 वर्ष मुदतवाढ या कालावधीकरीता भाडेपट्टीने घेण्यात आलेले आहेत.

ड्रोन प्रणालीद्वारे राज्याच्या 720 किमी लांबीच्या समुद्र किनाऱ्यापासून राज्याच्या सागरी हद्दीपर्यंत म्हणजे 12 सागरी मैल अंतरापर्यंत ड्रोनद्वारे म. सा.मा.नि.1981 (सुधारीत 2021) च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याकरिता वापर करण्यात येणार आहे. या ड्रोन प्रणालीद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नजर ठेवून अशा नौकांची माहिती पुराव्यासह उपलब्ध करून कार्यवाही करण्याकरिता ड्रोन प्रणालीच्या वेवसोल्यूशन/स्ट्रिमींगचा पुरावा म्हणून वापर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्यातील 7 सागरी जिल्ह्यांकरिता एकूण 09 ड्रोनची (शिरगाव – पालघर (1 नग), उत्तन – ठाणे (1 नग), गोराई – मुंबई उपनगर (1 नग), ससून डॉक – मुंबई शहर (1) नग), रेवदंडा व श्रीवर्धन रायगड (2 नग), मिरकरवाडा व साखरीनाटे रत्नागिरी (2 नग) आणि देवगड-सिंधुदूर्ग (1 नग) सेवा भाडेतत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यात आली आहे. आयुक्त, मत्स्यव्यवसाय कार्यालयात ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) कार्यान्वित करण्यात आलेला आहे.

सद्य:स्थितीत महाराष्ट्र राज्यातील 07 सागरी जिल्ह्यातील 07 नमूद ठिकाणी (शिरगाव-पालघर (1 नग), वेलंकनी उत्तन-ठाणे (1 नग), गोराई – मुंबई उपनगर (1 नग), ससून डॉक मुंबई शहर (1 नग), वरसोली रायगड (1 नग), भाटे रत्नागिरी (1 नग) आणि देवगड-सिंधुदूर्ग (1 नग)) ड्रोन प्रणालीचे उउड्डाण व आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उदघाटन दि.09 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वा. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई अपर मुख्य सचिव श्री.वेणुगोपाल रेड्डी (भा.प्र.से.) व मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आयुक्त डॉ.अतुल पाटणे (भा.प्र.से.) हे उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाचे औचित्य साधून याचवेळी ठाणे जिल्ह्यातील वेलंकनी उत्तन व पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथून ड्रोन प्रणालीचे उड्डाण करण्याचे आयोजित केले आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, मत्स्य सहकारी संस्थांचे / संघांचे प्रतिनिधी, नौका मालक यांना ड्रोन उडविण्याच्या वेलंकनी चर्च जवळ, उत्तन, जि. ठाणे व शिरगाव, जि. पालघर या ठिकाणी दि.09 जानेवारी 2025 रोजी सकाळी 09.45 वाजता आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अपर मुख्य सचिव, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ठाणे-पालघरचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय दिनेश पाटील यांनी केले आहे.00000

संबंधित पोस्ट

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रशासन सतर्क ; जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व यंत्रणांना निर्देश

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले दर्शन▪️उपमुख्यमंत्र्यांनी केली देहू येथे संत तुकाराम महाराज पादुकांची विधीवत पूजा

शेगाव तालुक्यातील केसगळती प्रकार रेशनच्या गव्हामुळे नाहीत– राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानपरिषदेत माहिती दिली.

देशाचे मोठे व्यावसायिक गौतम अडाणी यांनी दिली नवी मुंबई विमानतळाला ला भेट; विमानतळ जून 2025 पर्यंत उद्घाटनासाठी होणार सज्ज

पंतप्रधान खनिजक्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार प्रसाद लाड यांच्या ‘मी मुंबई अभियान अभिमान प्रतिष्ठान’ या संस्थेच्या माध्यमातून महिलांना-शिलाई मशीन, घरघंटी वाटप करून महिला दिनानिमित्त ‘ताई घे भरारी’ या उपक्रमाचा  सोहळा झाला संपन्न

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या आर्थिक लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन