vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या त्यागात देश सदैव ऋणात – केंद्रीय गृहमंत्री Amit Shah

 

नवी मुंबई, प्रतिनिधी : “हिंद दी चादर” म्हणून संपूर्ण देशात आदराने ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचे शहिदत्व हे केवळ शीख समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी आपले शीश अर्पण केले. देश त्यांच्या या त्यागाचा सदैव ऋणी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.

अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने नवी मुंबईतील खारघर येथे ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात गृहमंत्री शाह बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अखिल भारतीय धर्मजागरणचे प्रमुख शरदराव ढोले, शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा हरनाम सिंह जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज, बंजारा समाजाचे धर्मगुरू बाबूसिंग महाराज, राज्यस्तरीय समनव्य समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, राज्यस्तरीय समन्वय समितीचे निमंत्रक बल मलकित सिंह आदी उपस्थित होते.

या उपक्रमाचे महत्त्व विषद करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, प्रत्येक गुरुद्वारा आणि प्रत्येक वस्तीपर्यंत ‘हिंद दी चादर’चा संदेश पोहोचविण्यासाठी बाबा हरनाम सिंगजी यांनी मोठे कार्य केले आहे. राज्य शासनाने यापूर्वी नांदेड व नागपूर येथे आयोजित केलेल्या ‘हिंद दी चादर’ महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून नवी मुंबईतील कार्यक्रमात शीख बांधवांसह विविध समाजघटकांचा मोठा सहभाग असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शीख समाजासाठी सेवाकार्याची संधी साधत विविध प्रसंगी त्यांच्या परंपरा, श्रद्धा आणि योगदानाचा गौरव केला आहे. त्याच धर्तीवर देशभर ‘हिंद दी चादर’ पर्वाचे आयोजन करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.

यावेळी संत परंपरेचे स्मरण करताना त्यांनी पोहरादेवी येथील सेवालाल महाराज तसेच संत नामदेव महाराज यांना वंदन केले. संत नामदेव यांच्या रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहिबमध्ये झालेला आहे, ही भारतीय संतपरंपरेच्या व्यापकतेची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संत रविदास यांसारख्या संतांच्या विचारांनाही गुरु ग्रंथ साहेबमध्ये स्थान मिळाले आहे, यावरून भारतीय अध्यात्माची सर्वसमावेशकता स्पष्ट होते, असे त्यांनी नमूद केले

नववे श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या शहादतीचा विशेष उल्लेख करताना केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, अन्याय आणि अत्याचारांविरोधात उभे राहून त्यांनी दिलेले शहिदत्व भारतीय इतिहासातील अत्यंत प्रेरणादायी घटना आहे. “शीश दिया, पर सिर न झुकाया” हीच शीख गुरुपरंपरेची ओळख असून भारताच्या अखंडतेचा तो आधार आहे.

       शीख परंपरेतील नामजप, आराधना आणि लंगर यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, या मूल्यांमधून समाजातील समरसता आणि बंधुभाव दृढ होतो. गुरु गोविंद सिंग यांच्या काळात खालसा पंथाची स्थापना झाली आणि धर्मरक्षणासाठी अद्वितीय त्यागाची परंपरा अधिक बळकट झाली. त्यांच्या चारही सुपुत्रांच्या शहादतीनेही या परंपरेला अमरत्व प्राप्त झाले, असे त्यांनी नमूद केले.

आनंदपूर साहिबसारख्या पवित्र स्थळांचा उल्लेख करत केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले की, अन्यायकारक फर्मानांसमोर न झुकता गुरूंनी दाखवलेले साहस भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. नववे गुरु श्री गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या शहिदी समागमाचा संदेश महाराष्ट्र शासन राज्यातील छोट्या-छोट्या गावांपर्यंत पोहोचवत आहे, याबद्दल त्यांनी महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले.

भारताची संस्कृती ‘सर्व धर्म समभाव’ या तत्वावर आधारलेली आहे. ही परंपरा जपण्यासाठी शीख गुरूंनी केलेले योगदान अमूल्य आहे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध उभे राहणे हीच खरी देशभक्ती असल्याचे केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी यावेळी सांगितले.

स्वातंत्र्यानंतरही देशाच्या सुरक्षेसाठी शीख जवानांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. “एक भारत, श्रेष्ठ भारत” या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अशा ऐतिहासिक कार्यक्रमांची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी शहिदी समागम समितीचे मार्गदर्शक बाबा ‍हरनाम सिंग जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री शाह यांना जफरनामा देऊन सत्कार करण्यात आला.महाराष्ट्र आणि पंजाबमधील अध्यात्मिक व ऐतिहासिक संबंध बाबा‍ हरनाम सिंग जी, मुखी, दमदमी टकसाल, प्रधान संत समाज

राज्य समन्वय समितीचे मार्गदर्शक बाबा ‍ हरनाम सिंग म्हणाले की, नागपूर आणि तख्त सचखंड श्री हजूर साहिब, नांदेडनंतरचा हा तिसरा आणि सर्वात मोठा कार्यक्रम ऐतिहासिक उत्साहात पार पडला. यावेळी महाराष्ट्र आणि पंजाबमधील अध्यात्मिक व ऐतिहासिक संबंधांना उजाळा दिला.

    भारतीय संस्कृतीवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांनी सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानामुळेच आज भारतीय संस्कृती सुरक्षित आहे. संत नामदेव महाराज आणि गुरु नानक देव जी यांच्या काळापासून हे दोन्ही प्रांत जोडलेले आहेत. दहावे गुरु श्री गुरु गोविंद सिंह जी यांनी पंजाबमधून येऊन नांदेडच्या पावन भूमीवर वास्तव्य केले, ज्यामुळे हे नाते अधिक घट्ट झाले आहे.

महाराष्ट्र शासनाने अतिशय स्तुत्य निर्णय घेतले आहेत. ब्रिटीश काळापासून सिखलीगर समाजावर लादलेले निर्बंध हटवून त्यांना सन्मानाचे आणि समानतेचे अधिकार देण्याचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्य शासनाच्या सहकार्याने जनजागरण- शरदराव ढोले,अखिल भारतीय धर्मजागरण मंचाचे प्रमुख शरदराव ढोले यांनी प्रास्ताविकात संत नामदेव महाराजांच्या पंजाब-महाराष्ट्रातील आध्यात्मिक नात्याचा उल्लेख केला आणि वारकरी, सिंधी, मोहियाल तसेच गुरु नानकांना गुरु मानणाऱ्या विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले. उदासीन संप्रदायाच्या सहभागासह महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने ९६ रथांच्या माध्यमातून सुमारे २० हजार गावांमध्ये जनजागरण करण्यात आले असून ५०० हून अधिक पूर्णकालीन कार्यकर्त्यांच्या तीन महिन्यांच्या परिश्रमातून हा भव्य कार्यक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

०००००

संबंधित पोस्ट

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

कोल्हापूरच्या पर्यटन वैभवात कागलच्या पर्यटन व नौकायन केंद्रामुळे भर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे लोकार्पण

जागतिक एड्स नियंत्रण दिन व पंधरवडा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

खचू नका शासन सर्व नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठाम- पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

जय भीम पदयात्रा’ केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत संपन्न देशभरातील सर्व प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी झाली ऐतिहासिक पदयात्रा

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी८ महिला व १ पुरुष क्रिकेटपटूची राज्यस्तरीय संधी; प्रशिक्षक ऋषिकेश काने यांच्या मार्गदर्शनाला यश