vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन

सावित्री जत्रा’ महिलांना स्वावलंबी करणारी चळवळ-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन

 

पुणे, प्रतिनिधी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याने पावन झालेल्या भूमीत, त्यांच्या नावाने सुरु असलेली ‘सावित्री जत्रा’ हे केवळ एका प्रदर्शनाचं नाव नाही तर महिलांना स्वावलंबी करणारी एक चळवळ आहे, यामधील महिला बचत गटाच्या उत्पादनाला जागतिक पातळीवर होणारी मागणी ही अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्यच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषद, पुणे आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यावतीने कृषी महाविद्यालय मैदान, सिंचननगर येथे आयोजित ‘मिनी सरस सावित्री जत्रा’ जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन आणि यशवंत पंचायतराज अभियान विभागस्तरीय पुरस्कार व महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपायुक्त नितीन माने, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या सदिच्छादूत शिवाली परब आदी मान्यवर उपस्थित होते.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, सावित्री जत्रा हे नाव सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना, त्यांच्या सक्षमीकरणाच्या कार्याला समर्पित आणि साजेसे आहे. सावित्रीबाईंनी शिक्षण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा मार्ग दाखवला, त्याच विचारांची जत्रा आज ग्रामीण भागातील शेकडो महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होत आहे.

येथील प्रदर्शनात सुमारे १५० महिला स्वयंसहायता समूह सहभागी झाले असून ग्रामीण कला, परंपरा व संस्कृतीची ओळख असणारी महिला उत्पादने प्रदर्शित केली जात आहेत, ही स्तुत्य बाब आहे. प्रत्येक वस्तूमध्ये ग्रामीण भागातील भगिनीची मेहनत, स्वप्न आणि एक जिद्द सुध्दा आहे. सर्व पुणेकरांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, अधिकाधिक वस्तूची खरेदी करून कुटुंबाच्या संसाराला हातभार लावावा.बचत गटांना एकाच दिवशी ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप

गत वर्षीसुद्धा मिनी सरस सावित्री जत्रेत बचत गटांना एकाच दिवशी जवळपास १९ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले; आज देखील एकाच दिवशी ४० कोटी रुपयांचे कर्ज वाटप बचत गटांना करण्यात आले. यामाध्यमातून गेल्या एक वर्षात साधारणपणे ४०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले असून यामुळे ‘सरस सावित्री जत्रा’ कार्यक्रमाचा दर्जा दरवर्षी सरस होत चालला आहे, हेच यामधून सिद्ध होत आहे. यापुढे आपण एकत्रितरित्या तो अजून सरस करण्याचा प्रयत्न करुया

अर्थसंकल्पातही महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने पाऊल,मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सादर केलेल्या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण, ‘लखपती दीदी’ उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्याच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात येत आहेत.

येत्या आर्थिक वर्षात २५ लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यास मान्यता देण्यात आली असून यामुळे महिला बचत गटाच्या आमच्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांना मोठी बाजारपेठ तयार करण्यात आली आहे. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे, ही महत्वाची बाब असल्याचे त्यांनी नमुद केले.

ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणात ‘उमेद’ महत्त्वाची भूमिका

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी, त्यांना बाजारपेठेशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी उमेद या अभियानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या अभियानामुळे ग्रामीण महिलांचे आर्थिक स्वावलंबन, आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्यांची समाजात प्रतिष्ठा वाढल्याचे सांगून

महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. महिलांना स्थायी व्यवसाय मिळून त्यातून मोठी बाजारपेठ निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासनामार्फत भव्य ‘उमेद मार्ट’ मंजूर झाला असून त्याचे कामही सुरु आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात २६ पुण्यश्री सुपर मार्केट, ४ पुण्यश्री उपहारगृह, आंबेगाव येथे सावित्री दुकान देखील कार्यरत आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरही सावित्री दालन आहे. मागील वर्षी जिल्ह्यात १ लाखांहून अधिक लखपती दीदी झाल्या असून मार्च अखेरपर्यंत आणखी ३० हजार महिला लखपती दीदी करण्याचा आमचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

पुणे जिल्ह्यात उमेद अभियानाअंतर्गत सुमारे २७ हजार स्वयंसहायता समूह असून त्यामध्ये ३ लाखांपेक्षा अधिक महिला सहभागी झाल्या आहेत, या अभियानाच्या माध्यमातून स्वयंसहायता समूहांना १ हजार ६८७ कोटी इतका कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्याच्या विकासाचा नेहमीच ध्यास घेतला होता. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अनेक योजना राबवल्या आणि अर्थसंकल्पात त्यासाठी भरीव तरतुदी केल्या, जिल्हा नियोजन समितीच्या (डिपीडीसी) माध्यमातून भरघोस निधी दिला. त्यांचा हा विकासाचा वारसा आपल्याला सर्वांना पुढे घेऊन जायचे असल्याचेही यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे आवाहन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सरपंच, उपसरपंच आणि अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, चांगली कामगिरी करावी आणि आपल्या गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे नाव आपण उंचवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी केले.

प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, केंद्र सरकारच्या माध्यमातून महिलाकरिता विविध योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ४ कोटी पेक्षा अधिक घरे उपलब्ध देण्यात आली असून महिलांच्या नावे घर करुन देण्यात येत आहे. मुद्रा योजनेत ६० टक्के महिला लाभार्थी आहेत. रेल्वे स्थानक, विमानतळावर बचत गटाच्या महिलांकरिता स्टॉल बघायला मिळतात. विदेशात देखील वस्तूला मागणी होत असून त्यांचा कर्तृत्वाचा जागतिक पातळीवर दखल घेतली जात आहे. महिलांच्या उत्पादनाला भाव मिळवून देण्यासाठी ‘उमेद माल’ उभारणीचे काम सुरु आहेत, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाल्या.

श्री. वाघमारे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना शहरी बाजार पेठेशी जोडण्याचा उपक्रम आहे. ग्रामीण संस्कृती, बाजार पेठेला वाव देण्यासोबतच त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारा उत्सव आहे. जिल्ह्यात दोन लाखपेक्षा अधिक लखपती दीदी झाल्या आहेत. सावित्री जत्रा पाच दिवस चालणार असून पुणेकरांनी अधिकाधिक वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहन श्री. वाघमारे यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना कर्ज वितरण करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी यावेळी कार्यक्रमस्थळी स्टॉलला भेट देऊन उत्पादनाविषयी माहिती जाणून घेतली आणि महिला बचत गटांच्या सर्व भगिनींचे कौतुक केले.

०००

संबंधित पोस्ट

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta

पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षांचे प्रवेशपत्र उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र आणि सिंगापूर यांच्यातील सागरी सहकार्याला नवा आयाम* *वाढवण विकासासाठी सिंगापूर ने सहकार्य करावे* — *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

ग्रंथ पूजन करून ग्रंथोत्सव 2024 चे उद्घाटन संपन्न

हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे आज वारकरी संमेलन;* पूर्वतयारीचा घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta