
विमानतळ भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती; शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय..-सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट; जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका
गडचिरोली, प्रतिनिधी : प्रस्तावित गडचिरोली विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्रही आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले.
यावेळी सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आंदोलनाची परिस्थिती व चर्चेतील मुद्द्यांची माहिती दिली. यावेळी घेण्यात आलेल्या निर्णयाशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहमती दर्शविल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोली येथे विमानतळ उभारणीसाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी तसेच वन विभागाच्या अखत्यारितील एकूण ३११.८१ हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी राज्य शासनाने १२ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते.



