बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६-निवडणूक नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना निवडणूक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजवावी -उत्तम दिघे
बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६-निवडणूक नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांना निवडणूक कामकाजासंदर्भात मार्गदर्शन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजवावी -उत्तम दिघे
राज्य प्रतिनिधी-बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी यांची निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी कामकाजासंदर्भात आढावा बैठक घेवून मार्गदर्शन केले.
निवडणूकीच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश नवीन प्रशासकीय भवन येथील सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिले.
यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने, सर्व विभागाचे नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.श्री उत्तम दिघे म्हणाले, संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहिताची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याबाबत दक्षता घ्यावी. नियंत्रण कक्षाची सेवा २४ तास चालू सुरु आहेच, तथापि भ्रमणध्वनीद्वारे येणाऱ्या तक्रारींची काळजीपूर्वक नोंद घेवून त्या निकाली काढाव्यात. सि-व्हिजिल ॲपमध्ये तक्रार आल्यास १०० मिनिटाच्या आत तक्रारीबाबत कार्यवाही करावी.
राजकीय पक्षांना फलक लावणे, सभा घेणे, रॅलीचे आयोजन याबाबतच्या सर्व परवानग्या एक खिडकी कक्षात देण्यात याव्यात. त्यापूर्वी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची बारकाईने तपासणी करून परवानगी द्याव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या.
परिवहन विभागाने वाहनांची तपासणी करावी, वाहनांवरील बॅनरच्या मजकुरामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.एसएसटी, एफएसटी, नियंत्रण कक्ष, एक खिडकी कक्ष इत्यादी विभागाच्या नोडल अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या आणि कामकाजाबद्दल विशेष सूचना दिल्या.
मतदान करतांना मतदारांना अडथळा निर्माण होणार नाही,यादृष्टीने नियोजन मतदान केंद्रावर नियोजन करावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रात येणाऱ्या मतदान केंद्राची पाहणी करून तेथील फर्निचर, रॅम, वीज, पिण्याचे पाणी, शौचालयाच्या आदी सोई-सुविधा असल्याची खात्री करून घ्यावी. मतदान केंद्र आणि परिसरात स्वच्छता ठेवावे अशा सूचना श्री. दिघे यांनी दिल्या.बैठकीत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कामा विषयी माहिती दिली.