
एसटी संपाबाबत महत्त्वाची बातमी; बसवर दगडफेक करणाऱ्याची माहिती उघड…
मुंबई प्रतिनिधी
: कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच काही ठिकाणी एसटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, ठिकठिकाणी बसवर दगडफेक होण्याच्या घटना घडत आहेत. नगर शहरात अशाच एका घटनेत बसवर दगडफेक करणारा एसटीचाच कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संप मोडून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे प्रकार केले जात असल्याचं यानिमित्ताने उघड होत आहे.
नगर शहरात बुधवारी एसटी बसवर दगडफेक करताना मनोज विठ्ठल वैरागर (रा. शांतीपूर, तारकपूर, नगर) याला पकडण्यात आले. तो एसटीच्या पारनेर आगारातील कर्मचारी असल्याचं आढळून आलं आहे. दगडफेक झालेल्या बसचे चालक दत्तात्रय गंगाधर गिरी (रा. गणेशनगर ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात मनोज वैरागर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



