
लैंगिक भावनेनं लहान मुलांच्या खासगी अवयवांना स्पर्श करणं गुन्हा – मुंबई हायकोर्ट
मुंबई प्रतिनिधी
लैंगिक संबंधांच्या हेतूनं लहान मुलांच्या खासगी अवयवांना स्पर्श करणार हा गुन्हाच आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवला आहे. जखमा नसल्या तरी केवळ स्पर्श करणं हाही गुन्हाच आहे. तसंच पॉक्सो कायद्याच्या कक्षेत हे लैंगिक शोषणच असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं सांगितलं आहे. यावेळी न्यायालयाने पॉक्सो कायद्याच्या कलम ७ चा संदर्भही दिला आहे.
२०१३ साली आरोपीनं एका अल्पवयीन मुलीला वाईट हेतूने स्पर्श केला होता. याबद्दल त्याला २०१७ मध्ये पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. शिक्षेविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली. आरोपीला दोषी ठरवण्याचा निकाल योग्यच असल्याचं सांगत न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. तसंच त्याची शिक्षा कायम ठेवली आहे. मुलीच्या वडिलांनी वैयक्तिक रागातून आपल्याला खोट्या आरोपात अडकवल्याचा दावा आरोपीनं केला होता. मात्र हा दावा न्यायालयाने अमान्य केला आणि मुलीनं आणि तिच्या आईनं नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे निकाल दिला.
पिडीतांना जखम झालेली नसली तरी गुन्हेगारी हेतूही सिद्ध होत नाही. आणि तो सिद्ध कऱण्यासाठी जखमा होण्याची गरज नाही, असंही हायकोर्टाने सांगितलं आहे. केवळ शारिरीक शोषण हा उद्देश ठेवून केलेला स्पर्श पॉक्सोच्या कलम ७ नुसार लैंगिक शोषणच आहे, असं न्यायालयाने म्हटलं आहे.



