
पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार ; तनपुरेंच्या लक्षवेधीची फडणवीसांकडून दखल ; बडतर्फ करणार..
राज्य प्रतिनिधी
जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची फिर्याद देणा-या महिलेवरच पोलीस उपनिरिक्षकाने लैगिक अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस खात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेचे पडसाद आज थेट विधानसभेत उमटले.
राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पावसाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
राहूरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सज्जनकुमार यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राजक्त तनपुरे यांनी याप्रकरणी राहूरी पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.
प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत हा अत्याचाराचा मुद्दा उपस्थित करत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर करण्याची मागणी केली होती. फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अत्याचाराची घटना घडली असेल तर दोषींना बडतर्फ करण्याच आश्वासन दिले.राहुरी तालुक्यातील एका ३० वर्षीय महिलेने जमीन खरेदीत फसवणूक झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरु असताना
सज्जनकुमार नऱ्हेडा यांनी “यात माझा काय फायदा ? पैशा व्यतिरिक्त काय फायदा होईल? असे म्हणत पिडीत महिलेचा मोबाईल नंबर मागितला. पिडीतेला व्हाट्सअपवर मेसेज पाठवून ‘तु खुप छान दिसते, माझ्याशी मैत्री कर’ अशी जबरदस्ती केली. पिडीतेला स्वतःच्या घरी बोलावून सज्जनकुमार याने तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पीडीत महिलेने दिली आहे.



