
जिल्ह्यातील मतदान केंद्रांसाठी बूथ जागरूकता समूह..
राज्य प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा आणि मतदार जाणीव जागृतीसाठी संपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व २ हजार २६५ मतदान केंद्रावर बूथ जागरूकता समूहांची स्थापना करण्यात आली आहे. यामाध्यमातून जिल्हा प्रशासन सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक प्रक्रिया सहभाग कार्यक्रम राबविणार आहे.
लोकशाहीचा उत्सव समजली जाणारी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दि. 26 एप्रिल 2024 रोजी होत आहे. त्यादृष्टीने लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. मतदानाचा हक्क बजावणे ही प्रत्येक मतदाराची जबाबदारी आहे. त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती निर्माण करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या संकल्पनेतून व्यापक व महत्वाकांक्षी मतदार जाणीव जागृतीविषयक कार्यक्रम राबविला जाणार आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार शिक्षण व निवडणूक प्रक्रिया सहभाग कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील ४७० शहरी आणि १ हजार ७९५ ग्रामीण अशा एकूण २ हजार २६५ मतदान केंद्रावर बूथ जागरूकता समूह कार्यान्वीत करण्यात आले आहे. मतदान केंद्रासाठी नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी समूहाचे संयोजक असणार आहे. मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक ते सहकार्य करणे, मतदारांमध्ये जाणीव जागृती करणे, महिला व दिव्यांग मतदारांचा सहभाग वाढविणे अशा विविध उद्देशाने मतदान केंद्र परिसरातील मतदारांसाठी सुलभक म्हणून हा समूह कार्य करणार आहे.
जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रासाठी बूथ जागृकता समूह स्थापन करण्यात आले आहे. यामुळे भयमुक्त व शांततापूर्ण रितीने जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी या समूहानी मतदारांना सहकार्य करावे आणि जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले आहे.



