
शेतकऱ्यांनी महाऊर्जेच्या फसव्या संकेतस्थळापासून सावध राहण्याचे आवाहन
राज्य प्रतिनिधी : महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांनी अवैध फसव्या संकेतस्थळापासून किंवा इतर माध्यमांपासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाने केले आहे.
महाऊर्जामार्फत महाकृषी ऊर्जा अभियान पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ३, ५ व ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे पारेषण विरहित सौर कृषी पंप देण्यात येते. याकरीता सौर कृषी पंपासाठी पात्र लाभार्थ्यांना सौर पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना १० टक्के आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५ टक्के लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीचा एसएमएस पाठवला जातो. सदर योजना राबविण्याकरीता महाऊर्जामार्फत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांनी याच संकेतस्थळांचा उपयोग नोंदणी व इतर माहिती प्राप्त करण्याकरीता करावा.
लाभार्थ्यांनी kusum.mahaurja.com याव्यतिरिक्त महाऊर्जातर्फे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारण्यात येत नाहीत. सद्यःस्थितीत वेगवेगळ्या बनावट वेबसाईट, सोशल मिडीया प्लॅटफार्म इत्यादींमार्फत शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचे, तसेच शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी खोटे संदेश पाठविण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा खोटे, फसवे संकेतस्थळ, फसवे दुरध्वनी, भ्रमणध्वनीचे संभाषण, आवाहनाला शेतकऱ्यांनी बळी पडू नये. अशा संकेतस्थळ, अॅपवर कोणत्याही पद्धतीने पैशाचा भरणा करूं नये, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक, महाऊर्जा अमरावती यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा कार्यालय, महाऊर्जा, अकोला दुरध्वनी क्र. ०७२४-२४५२३११ व domedaakola@mahaurja.com वर संपर्क साधावा, तसेच विभागीय कार्यालय, महाऊर्जा, अमरावती दुरध्वनी क्र. ०७२१-२६६१६१० व domedaamravati@mahaurj.com वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000



