
शहापूरमधील दुर्गम भागातील मतदान केंद्रावर संपर्क यंत्रणा उभारण्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज
ठाणे, प्रतिनिधी)- मोबाईल सेवा व इंटरनेटची कनेटिव्हीटी नसलेल्या शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील पाचघर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया सुरळीत व्हावी, निवडणूक काळात तेथील मतदान कर्मचाऱ्यांशी संपर्क साधणे सुलभ व्हावे, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाने अक्शन प्लॅन तयार केला आहे. मोबाईल व इंटनेट सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांबरोबर बैठक घेऊन संपर्क यंत्रणा स्थापण्याची तयारी केली आहे.
23 भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 135 शहापूर विधानसभा मतदारसंघातील पाचघर गावातील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र (पीएस) हे डोंगराळ भागात वसलेले आहे. या भागात मोबाईल व इंटरनेटची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे निवडणुकीच्या कर्तव्यावर या ठिकाणी नियुक्त असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नेहमीच दळणवळणाच्या व संपर्काच्या आव्हानांना सामोरे जावे लागते. तसेच मतदाना दिवशी मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना जिल्हा निवडणूक यंत्रणेशी संपर्क साधण्यासाठी अडचणी निर्माण होत होत्या. कोणताही संदेश अथवा माहिती पोहचविण्यासाठी एका कर्मचाऱ्याची रनर म्हणून नियुक्त करण्याशिवाय पर्याय नव्हता.
यावर मार्ग काढण्यासाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाने मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाचघर येथे संपर्क यंत्रणा स्थापन करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत मोबाईल व इंटरनेट कनेटिव्हिटी कमी असलेल्या, खराब असलेल्या अथवा कनेटिव्हीटी नसलेल्या शॅडो झोन भागात संपर्क साधण्यासाठी कनेटिव्हिटी सुरू करण्याची तयारी केली आहे.
“तंत्रज्ञान हा निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग बनला आहे. निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांसाठी अनेक मोबाईल ऍप्लिकेशन्स आवश्यक आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मोबाईल आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा मुद्दा हे एक मोठे आव्हान आहे. सॅटेलाइट फोनच्या मदतीने निवडणूक प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आम्ही ‘शॅडो झोन’ कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना करत आहोत, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.
मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी बूथ अधिकाऱ्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत मतदानाची माहिती पोच करण्यासाठी दळणवळण व संपर्क यंत्रणा मजबूत करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठाण्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे, निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचे परिवहन व दळणवळण विभागाचे सुनील महाले आणि महेंद्रकुमार मेटकरी तसेच बीएसएनएलचे श्री. अबू आमीर या अधिकाऱ्यांचे एक पथक निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपर्क सुरळीत होण्यासाठी काम करत आहेत.
000000000000



