
समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करणाऱ्या-फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकावर गुन्हा दाखल…
ठाणे, प्रतिनिधी समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचा मजकूर समाजमाध्यमांवर पोस्ट करणाऱ्या “आमची मुंबई” या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकांविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी 145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघातील आचारसंहिता पथकाने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
145 मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाचे आचारसंहिता पथक प्रमुख नरेंद्र चव्हाण यांनी याबाबत नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ‘आमची मुंबई’या नावाच्या फेसबुक व इन्स्टाग्राम या अकाऊंटवरुन ‘मराठी मुंबई की मुस्लिम मुंबई’, ‘मिरा-भाईंदर काँग्रेसला मत म्हणजे मुस्लिम लागुलचालनाला मत’, ‘काँग्रेसला मत म्हणजे लव जिहादला मत, ‘मविआ सत्तेत आलीत तर मुस्लिम मुख्यमंत्र्यांसाठी मत’अशा आशयाचे मजकूर तयार करुन राहुल गांधी व मुझ्झ्फ्फर हुसेन यांच्याविरुद्ध बदनामीकारक छायाचित्र व दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मजूकर असलेली पोस्ट प्रसिद्ध केल्याची तक्रार नरेंद्र चव्हाण यांच्याकडे सॅम्युअल करात, भरत विलनकर, अनिल पवार, संकेत मोहिते, भरत छेडा, रफिक पठाण, यशपाल सुरेका, शैलेश माथुरे, कुणाल काटकर, राहुल राय यांनी दि. 2 नोव्हेंबर 2024 रोजीच्या अर्जान्वये केली होती.
या तक्रारीची दखल घेवून “आमची मुंबई” नावाच्या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टची शहानिशा केली असता आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केला असल्याचे सिद्ध झाले. याची दखल घेवून आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी “आमची मुंबई” या फेसबुक व इन्स्टाग्राम अकाऊंटधारकाविरोधात भारतीय न्याय संहिता कायद्याचे कलम 196 व लोकप्रतिनिधीत्व अधिनियमचे कलम 125 अन्वये नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरी समाजात जातीय तेढ निर्माण होईल, एखाद्याचे चारित्र्यहनन होईल, जात-धर्म-पंथ, याविषयी आक्षेपार्ह मजकूर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रदर्शित/प्रसारित करू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासन व एकत्रित माध्यम कक्षाने केले आहे.
00000



