vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनानंतर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन सुविधा, स्थानिक रोजगार आणि स्वच्छतेवर भर—महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकनानंतर समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन सुविधा, स्थानिक रोजगार आणि स्वच्छतेवर भर—महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याने शहराचे नाव देशाच्या नकाशावर प्रसिद्ध झाले असून, याचा सार्थ अभिमान आहे, अशी भावना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केली. मानांकन टिकविण्यासाठी स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांवर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, महिला व बालविकास आयुक्त पुणे वर्षा उंटवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, यांच्यासह विविध शासकीय विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लाडघर व गुहागर या समुद्रकिनाऱ्यांना 2026-27 च्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचे ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन मिळाल्याने निसर्गसौंदर्याने नटलेला आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला श्रीवर्धन शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळू शकते. या मानांकनामुळे समुद्रकिनाऱ्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण होण्यासोबतच पर्यावरण संवर्धन, समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, सुरक्षितता, पाणी गुणवत्ता आणि पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत याभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. श्रीवर्धन परिसरातील पर्यटन व्यवसायाला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्यास पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, हॉटेल व्यवसाय, स्थानिक व्यावसायिक, छोटे दुकानदार, मच्छीमार आणि पर्यटनाशी संबंधित विविध घटकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होऊ शकतात. श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याला ब्ल्यू आंतरराष्ट्रीय दर्जाचे’ फ्लॅग’ मानांकन मिळाल्याने पर्यटन विकासाला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरिकांच्या सहभागातून शहर स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू असून, कोकण विभागात श्रीवर्धनने स्वच्छतेत प्रथम क्रमांक मिळविल्याचेही त्यांनी नमूद केले.

मानांकनामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने पार्किंग, स्वच्छता आणि अन्य मूलभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. समुद्रकिनाऱ्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलसाठीस्थानिक व्यावसायिकांना प्राधान्य दिले जाईल. सर्व स्टॉल एकसमान स्वरूपात उभारून रोजगाराच्या संधी वाढविण्यावर भर राहील, असे तटकरे यांनी सांगितले. शहरातील तारांगण आणि पेशवे स्मारकाची कामे अंतिम टप्प्यात असून, मुळगाव, जीवना आणि आरावी परिसरातही पर्यटन सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे.

श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून चार कोटींच्या निधीची तरतूद असून, त्यापैकी 1 कोटी 44 लक्ष रुपये मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित निधीसाठी पाठपुरावा सुरू आहे. केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाकडूनही अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. श्रीवर्धनला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी स्वच्छता, सुरक्षा, स्थानिक रोजगार आणि पर्यटक सुविधांचा समतोल राखणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या सहकार्याने पर्यटन विकासाला गती देणार असल्याचा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

या बैठकी नंतर त्यांनी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, निरीक्षक गृह व बालगृह शासकीय कृपा महिला वसतीगृह कर्जत, तळा नगरपंचायतच्या विविध विकास कामे व अडीअडचणीबाबत तसेच कोकण आपत्ती सौम्यीकरण उपाययोजना अंतर्गत मंजूर शेल्टरहोम (निवारा केंद्र) बाबत आढावा घेवून यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील व शासनाकडून लागणाऱ्या निधीचीही उपलब्धतता करुन दिली जाईल असे सांगितले.

००००

संबंधित पोस्ट

पाणी फॉउंडेशन फार्मर कप 2026 जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

जिल्ह्यात कृषि दिनानिमित्त 15 लाख वृक्षारोपण,संबंधित विभागांनी काटेकोरपणे नियोजन करावे   – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- लोकप्रतिनिधी, खाजगी संस्था, एनजीओ यांचा सहभाग घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करा

नटराज व विश्वकर्मा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा

महाराष्ट्र शासनाचे ५, १३, २३ वर्ष मुदतीचे रोखे विक्रीस

कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना तातडीने नवीन पीक कर्ज द्या- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील• प्रत्येक तालुक्यात विशेष पीक कर्ज शिबिरे घेण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश• लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार पीक कर्ज शिबीरांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta