
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांना नाव नोंदणीची पुन्हा संधीASDD प्रवर्गातील मतदारांसाठी गणना प्रपत्र भरण्याचे आवाहन; ३० नोव्हेंबरपर्यंत प्रपत्रांचे वितरण व संकलन
बुलढाणा, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार (ASDD) प्रवर्गातील मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी पुन्हा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने गणना प्रपत्र तयार करणे, वितरण व संकलन तसेच मतदार यादी प्रसिद्ध करण्याच्या वेळापत्रकात सुधारणा करण्यात आली आहे.भारत निवडणूक आयोगाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार गणना प्रपत्र तयार करणे व मुद्रित करण्याची कार्यवाही १८ नोव्हेंबरपर्यंत, गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन १८ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत, तर गणना प्रपत्रांची (EFs) निकाली काढण्याची कार्यवाही १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.तसेच पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नोटीस टप्पा, दावे व हरकतींचा निपटारा ३१ ऑगस्ट ते १५ डिसेंबर २०२६ या सुधारित कालावधीत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी २२ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अनुपस्थित, स्थलांतरित, मृत किंवा दुबार मतदार म्हणून नोंद झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या पात्र मतदारांना आयोगाने पुन्हा संधी दिली आहे. यासाठी १८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्या पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट झालेली नाहीत, त्यांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी पुढाकार घ्यावा. यासाठी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://buldhana.nic.in येथे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांनी या यादीत आपले नाव तपासून घ्यावे.
प्रारूप मतदार यादीत पात्र व्यक्तीचे नाव समाविष्ट नसल्यास किंवा गणना प्रपत्र (Enumeration Form) संबंधित बूथस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे जमा केले नसल्यामुळे नाव यादीत आले नसल्यास, आवश्यक पुराव्यांसह ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे गणना प्रपत्र सादर करावे. यासाठी गणना प्रपत्रासोबत असलेले परिशिष्ट-ब व परिशिष्ट-क वस्तुस्थितीनुसार भरून द्यावेत.
विशेष पुनरीक्षणादरम्यान ज्या मतदारांची नावे ASDD प्रवर्गात समाविष्ट झाल्यामुळे प्रारूप मतदार यादीत येऊ शकली नाहीत, अशा मतदारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. संबंधित मतदारांना त्यांच्या सध्याच्या सर्वसाधारण रहिवासाच्या ठिकाणी संबंधित सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत गणना प्रपत्र भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.याशिवाय, मतदारांची जुनी माहिती ECINET प्रणालीवर उपलब्ध असल्यास संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत गणना प्रपत्र प्रत्यक्ष, व्हॉट्सॲप, ई-मेल अथवा एसएमएसद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मतदारांना संकेतस्थळ किंवा ECINET प्रणालीच्या माध्यमातून आपला EPIC क्रमांक प्रविष्ट करून गणना प्रपत्र डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo](https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo या संकेतस्थळावर ASDD मतदारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित मतदारांनी फॉर्म क्रमांक ६ भरून ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावा. याबाबत आवश्यक मार्गदर्शनासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
दरम्यान, ASDD यादीतील ज्या मतदारांची नावे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर समाविष्ट झाली असतील आणि त्यांनी यापूर्वी फॉर्म क्रमांक ६ भरला असेल, त्यांना पुन्हा गणना प्रपत्र भरण्याची आवश्यकता नाही.जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी व मतदारांनी या सुधारित कार्यक्रमाची नोंद घेऊन मतदार यादीतील आपली नोंद तपासावी. तसेच सुरू असलेल्या पडताळणी प्रक्रियेत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करून आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.
0000



