vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

मनुष्यता जपणाऱ्यालाच मिळते खऱ्या जीवनाची श्रीमंती; महासतींचे प्रतिपादन…

मनुष्यता जपणाऱ्यालाच मिळते खऱ्या जीवनाची श्रीमंती; महासतींचे प्रतिपादन…

जालना | प्रतिनिधी-चातुर्मासानिमित्त आयोजित धर्मसभेत महासतींच्या प्रभावी प्रवचनातून मानवता, करुणा, क्षमा आणि तपश्चर्या यांचा प्रभावी संदेश देण्यात आला. भगवान महावीरांच्या शिकवणीचा आधार घेत त्यांनी मनुष्यजन्माचे महत्त्व, कर्मसिद्धांत आणि परोपकाराच्या भावनेचे सविस्तर विवेचन केले. यावेळी ‘राणी सोहन चरित्र’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कथामालेलाही प्रारंभ करण्यात आला.

प्रवचनादरम्यान महासतींनी तीन पुत्रांची प्रेरणादायी कथा सांगितली. एका श्रीमंत पित्याने आपल्या तीन पुत्रांपैकी सर्वाधिक योग्य व सद्गुणी पुत्र कोण, याची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी केलेल्या श्रेष्ठ कार्याविषयी विचारणा केली. पहिल्या पुत्राने स्वार्थासाठी दुसऱ्याचे नुकसान केल्याचे सांगितले, तर दुसऱ्या पुत्राने एका गरजू व्यक्तीला अल्प आर्थिक मदत केल्याचे सांगितले. मात्र तिसऱ्या पुत्राने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत बुडणाऱ्या आपल्या कट्टर शत्रूचे प्राण वाचविल्याचे सांगितले.

या प्रसंगाचे वर्णन करताना महासती म्हणाल्या की, शत्रूला बुडताना पाहून त्याच्या मनात सूडाची भावना निर्माण झाली नाही. उलट, “तो प्रथम एक माणूस आहे,” या भावनेतून त्याने क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली आणि त्याचे प्राण वाचविले. शुद्धीवर आल्यानंतर त्या व्यक्तीने आपली शत्रुता विसरून तिसऱ्या पुत्राला मित्र म्हणून स्वीकारले. ही घटना केवळ एका व्यक्तीचे प्राण वाचविण्यापुरती मर्यादित नव्हती, तर दोन मनांतील द्वेष, अहंकार आणि वैर कायमचे संपुष्टात आणणारी होती. या निःस्वार्थ कृतीमुळे पित्याने मौल्यवान रत्नाचा खरा अधिकारी म्हणून तिसऱ्या पुत्राची निवड केली.

महासतींनी सांगितले की, मनुष्यजन्म मिळणे हे अत्यंत दुर्लभ आहे. मात्र केवळ मनुष्य म्हणून जन्म घेणे पुरेसे नसून जीवनात मनुष्यता, दया, क्षमा, संवेदना आणि परोपकार या गुणांचा स्वीकार करणे अधिक महत्त्वाचे आहे. इतरांच्या वेदना स्वतःच्या मानून त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा व्यक्तीच खऱ्या अर्थाने मानवतेचे दर्शन घडवितो. “जो स्वतः दुःख सहन करूनही दुसऱ्यांच्या दुःखाचे निवारण करतो, तोच खरा मनुष्य आहे,” असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.

प्रवचनात भगवान महावीरांनी प्रतिपादित केलेल्या ‘मानुष रत्न’ या संकल्पनेचाही उल्लेख करण्यात आला. मानवजन्म हा परम दुर्लभ असल्याचे सांगत प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे, स्वतःतील दोष दूर करावेत आणि प्रेम, करुणा, संयम व सेवाभाव यांचा अंगीकार करून जीवन समृद्ध करावे, असे आवाहन करण्यात आले.

यानंतर ब्रह्मचारिणी प्रखर वक्त्या महासती श्री कमलावतीजी महाराज यांनी १९७२ मध्ये काव्यरूपात साकारलेल्या ‘राणी सोहन चरित्र’ या सत्यकथेला प्रारंभ करण्यात आला. मुघल सम्राट अकबराच्या राज्यकालीन ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित या कथेत नारीशक्ती, चारित्र्य, धर्मनिष्ठा, त्याग, शौर्य आणि स्वाभिमान यांचे प्रभावी चित्रण असल्याचे सांगण्यात आले. ही कथा पुढील प्रवचनांमध्ये क्रमशः उलगडणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

धर्मसभेत चातुर्मास अधिक फलदायी करण्यासाठी श्रावक-श्राविकांना नवकारसी, पोरसी, दोन पोरसी, एकासना, उपवास, नीवी, अभिग्रह, चरणस्थान आदी विविध तप-आराधनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. आपल्या क्षमतेनुसार तपाचा संकल्प करून नावनोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले.

धर्म, तप, सेवा आणि मानवतेच्या आचरणातूनच जीवन सार्थकी लागते, असा संदेश देत प्रवचनाची सांगता झाली.

छायाचित्र : दर्पण जैन

संबंधित पोस्ट

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन केले “आम्ही स्त्रीच्या डोळ्यातून एक अश्रू देखील पडू देऊ शकत नाही,” – गुरुदेव श्री श्री रविशंकर

vishwatmaklokswamivarta

गुरुपौर्णिमे निमीत्त दत्त मंदीर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

लोणंद येथे पालखी सोहळ्यात ‘संवाद वारी’ प्रदर्शनास वारकऱ्यांचा प्रतिसाद

*श्रावण महिन्याचे महत्त्व* 

vishwatmaklokswamivarta

नवीन वर्षात ज्ञानालाच मार्गदर्शक होऊ दे*  *गुरुदेव श्री श्री रविशंकर* 

महाकुंभ,आर्ट ऑफ लिविंगच्या स्वयंसेवकांनी ६ लाखांहून अधिक कल्पवासींना अन्न पुरवठा वितरित केला; १.५ लाख भाविकांना निवास

vishwatmaklokswamivarta