vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेत तडजोड नको; निकृष्ट कामांवर कठोर कारवाई – मंत्री शिवेंद्रराजे भोंसले पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र ‘विशेष पॅकेज’ची मागणी करणार

गडचिरोलीतील रस्ते-पुलांच्या गुणवत्तेत तडजोड नको; निकृष्ट कामांवर कठोर कारवाई – मंत्री शिवेंद्रराजे भोंसले पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे स्वतंत्र ‘विशेष पॅकेज’ची मागणी करणार

गडचिरोली, प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. निकृष्ट अथवा सदोष कामांची चौकशी करून दोषींवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) शिवेंद्रराजे भोंसले यांनी आज दिला. जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती व पुनर्बांधणीचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.गडचिरोली जिल्ह्यातील पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी स्वतंत्र ‘विशेष पॅकेज’ देण्याची मागणी राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी यावेळी केली. त्याची दखल घेत कोकणच्या धर्तीवर जिल्ह्यातील आवश्यक लहान-मोठ्या पुलांचा सर्वंकष प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र विशेष निधी पॅकेजची मागणी करण्यात येईल, असे मंत्री श्री भोंसले यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान सकाळी अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (UIT) परिसराला भेट देऊन विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात गोंडवाना विद्यापीठाची विकासकामे, मायनिंग कॉरिडॉर तसेच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) अंतर्गत प्रस्तावित व सुरू असलेल्या विविध रस्ते व पूल कामांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि खासदार डॉ. नामदेव किरसान दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रमेश, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नागपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे, गडचिरोली मंडळाच्या अधीक्षक अभियंता सोनाली चव्हाण, राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल केळकर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीदरम्यान नद्या-नाल्यांना येणाऱ्या पुरामुळे अनेक भागांचा संपर्क तुटतो. ही भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. पुलांची सद्यस्थिती, भारवहन क्षमता, आवश्यक दुरुस्ती अथवा पुनर्बांधणी याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून प्राधान्यक्रम निश्चित करावा. विशेषतः अतिवृष्टी व पुरामुळे प्रभावित होणाऱ्या पुलांची तपासणी प्राधान्याने करण्याच्या सूचना मंत्री भोंसले यांनी दिल्या.

जिल्ह्यात ज्या पुलांचे नुकसान झाले आहे अथवा बांधकामादरम्यान जे पूल कोसळले आहेत, अशा प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. तांत्रिक त्रुटी, निकृष्ट काम किंवा निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीतील भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस आणि पुराची तीव्रता लक्षात घेऊन नवीन पुलांचे डिझाईन आधुनिक तांत्रिक निकषांनुसार करावे. आवश्यकतेनुसार वेल अथवा पाइल फाउंडेशनसह मजबूत संरचनांचा अवलंब करून पूल सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारे होतील याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी ‘विशेष पॅकेज’

जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागांत आवश्यक पुलांअभावी पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुलांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद आवश्यक असल्याचा मुद्दा सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी बैठकीत मांडला. गडचिरोलीसाठी स्वतंत्र ‘विशेष पॅकेज’ देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.

या मागणीची दखल घेत मंत्री भोंसले यांनी जिल्ह्यातील आवश्यक लहान-मोठ्या पुलांची गरज, प्रलंबित कामे आणि त्यासाठी आवश्यक निधीचा सर्वंकष प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. कोकणच्या धर्तीवर गडचिरोलीतील पुलांसाठी स्वतंत्र विशेष निधी पॅकेज मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

रस्ते आणि पूल बांधकामाचे तांत्रिक स्वरूप वेगवेगळे असल्याने संबंधित क्षेत्रातील विशेष कौशल्य आणि अनुभव असलेल्या स्वतंत्र कंत्राटदारांची नियुक्ती करण्याची मागणीही ॲड. जयस्वाल यांनी केली.AIIB अंतर्गत २,७५२ कोटींच्या सहा रस्त्यांचे प्रस्ताव

एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील एकूण २७७.६० किलोमीटर लांबीच्या सहा महत्त्वपूर्ण रस्त्यांसाठी सुमारे २,७५२ कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) बैठकीत सादर करण्यात आले.

डीपीआर तयार करताना केवळ कार्यालयीन स्तरावर नियोजन न करता प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थिती आणि भविष्यातील वाहतुकीची गरज विचारात घ्यावी. स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या सूचना आणि स्थानिक गरजांचा डीपीआरमध्ये समावेश करावा, असे मंत्री भोंसले यांनी सांगितले.

जिल्ह्यातील वाढती औद्योगिक व खनिज वाहतूक आणि अवजड वाहनांची संख्या लक्षात घेऊन रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सब-ग्रेड तसेच अन्य तांत्रिक घटकांचा दर्जा उच्च प्रतीचा ठेवावा. कामांची नियमित क्षेत्रीय पाहणी करून स्वतंत्र यंत्रणेमार्फत ‘थर्ड पार्टी क्वालिटी ऑडिट’ करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

वन व वन्यजीव विभागाच्या परवानग्यांमुळे कामांना अनावश्यक विलंब होऊ नये, यासाठी आवश्यक मंजुऱ्यांचा संबंधित यंत्रणांनी समन्वयाने पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.

सुमारे ४९२ कोटींच्या मायनिंग कॉरिडॉर कामांचा आढावा

बैठकीत मायनिंग कॉरिडॉर अंतर्गत सुरू असलेल्या सुमारे ४९१.९१ कोटी रुपयांच्या विविध रस्ते व पूल कामांची प्रगती तपासण्यात आली. यामध्ये चंद्रपूर–लोहारा–घंटाचौकी–हरणघाट–चामोर्शी रस्त्याचे २०० कोटी रुपयांचे काम, पारवा–केळापूर–वणी–नागभीड–वडसा–कुरखेडा–कोरची रस्त्याचे ९४.९१ कोटी रुपयांचे काम, भाडभीडी–घोट–रेगडी–कसनसूर–भामरागड रस्त्याचे २७ कोटी रुपयांचे काम, मुधोली–लक्ष्मणपूर–सुभाषग्राम रस्त्याचे ११५ कोटी रुपयांचे काम तसेच भाडभीडी–कसनसूर पुलाच्या ५५ कोटी रुपयांच्या बांधकामाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला येत असलेली गती आणि वाढती खनिज वाहतूक लक्षात घेता मायनिंग कॉरिडॉरमधील रस्त्यांची क्षमता, रुंदी व गुणवत्ता भविष्यातील वाहतुकीच्या गरजांनुसार असावी. अवजड वाहनांमुळे रस्त्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर निर्धारित तांत्रिक निकषांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश मंत्री भोंसले यांनी दिले.

गोंडवाना विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेची पाहणी

दौऱ्याच्या प्रारंभी मंत्री भोंसले यांनी अडपल्ली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या तंत्रज्ञान संस्था परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नकाशाद्वारे उपलब्ध जागा, सद्यस्थितीतील बांधकामे आणि भविष्यातील गरजांनुसार प्रस्तावित विकासकामांची माहिती दिली.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार तांत्रिक शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आवश्यक इमारती आणि सुसज्ज पायाभूत सुविधांचे नियोजन भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन करावे. प्रस्तावित कामे दर्जेदार आणि निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

संबंधित पोस्ट

बंदरे विभागाने लोकाभिमूख होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा- बंदरे मंत्री नितेश राणे

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…

एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी-सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

महाराष्ट्रात 1 जानेवारी 2025 पासून 5 वाघांचा नैसर्गिक तर 3 वाघांचा अपघाती मृत्यू वन विभागाची माहिती 3 वाघांच्या शिकारीची चौकशी सुरु

vishwatmaklokswamivarta

लोहमार्ग पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांचे समाजसेवक मुसा खान व मुन्नाभाई यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन 

चिखली तालुक्यातील सवना येथे ड्रोन तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक; नॅनो युरिया फवारणीचे मार्गदर्शन