
रेल्वे मार्गे होणाऱ्या अमली पदार्थ व गुटख्याच्या तस्करीला आळा घाला-पश्चिम रेल्वे मार्गावरील मिरा रोड, भाईंदर स्थानकांवरील प्रवासी सुविधांसह सुरक्षेच्या मुद्यावर चर्चा प्रवासी डेक तातडीने खुला करा; एसी लोकल वाढवा, एक्सप्रेस गाड्यांना भाईंदरमध्ये थांबा द्या पश्चिम रेल्वे मार्गावरील खासदारांच्या बैठकीत खासदार नरेश म्हस्के आक्रमक..
ठाणे प्रतिनिधी – ठाणे लोकसभा मतदारसंघातील मिरा रोड आणि भाईंदर रेल्वे स्थानकांवरील प्रलंबित कामे, अपुऱ्या सुविधा आणि वाढत्या गर्दीच्या प्रश्नांकडे खासदार नरेश गणपत म्हस्के यांनी पश्चिम रेल्वे प्रशासनाने आयोजित केलेल्या खासदारांच्या बैठकीत लक्ष वेधले आहे. या दोन्ही स्थानकांवरील प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि आरामदायी करण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आठ महत्त्वाच्या मागण्यांचे निवेदन दिले. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत, प्रवासी सुविधा वाढवाव्यात आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच महाराष्ट्रात होणारी अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटख्याची तस्करी रोखण्यासाठी रेल्वे मार्गांवरील तपासणी यंत्रणा अधिक सक्षम करावी, अशी सूचनाही खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीत केली.
पश्चिम रेल्वे महामार्गावरील खासदारांची आज चर्चगेट येथील मुख्यालयात खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला खासदार नरेश म्हस्के, खासदार रवींद्र वायकर, खासदार शोभाताई बच्छाव, खासदार उज्वल निकम,खासदार अनिल देसाई, दमणचे खासदार उन्मेष पटेल, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी रामाश्रय पांडे (जीएम), पंकज सिंग (डीआरएम) व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खासदार नरेश म्हस्के यांनी मीरारोड आणि भाईंदर स्थानकातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
रेल्वे मार्गावरून प्रवासी गाड्यांसह मालवाहतुकीचीही नियमित ये-जा होते. अशा परिस्थितीत प्रतिबंधित गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ किंवा अमली पदार्थांची बेकायदा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यास संबंधित यंत्रणांनी तातडीने तपास करणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकांवर संशयास्पद पार्सल, बॅगा आणि मालवाहतुकीची तपासणी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, आधुनिक उपकरणे आणि गुप्त माहिती संकलन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. केवळ स्थानकांवरील तपासणीपुरते मर्यादित न राहता, अशा प्रकारच्या तस्करीमागील पुरवठादार, वाहतूकदार आणि वितरण साखळीचा शोध घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी बैठकीच्या प्रारंभी सांगितले.
मिरा रोड आणि भाईंदर ही पश्चिम रेल्वे मार्गावरील महत्त्वाची आणि गजबजलेली स्थानके आहेत. या परिसरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, मुंबईच्या दिशेने दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि अन्य प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्थानकांवरील पायाभूत सुविधा, तिकीट व्यवस्था, चढण्या-उतरण्याच्या सोयी आणि रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रवाशांच्या दैनंदिन अडचणी सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.
मिरा रोडचा प्रवासी डेक तातडीने खुला करण्याची मागणी,
मिरा रोड रेल्वे स्थानकावर दक्षिण ते उत्तर दिशेने प्रवाशांची ये-जा सुलभ करण्यासाठी फूट ओव्हर ब्रिजला जोडणारा नवीन प्रवासी डेक तयार करण्यात आला आहे. या डेकचे उर्वरित काम पूर्ण करून तो प्रवाशांसाठी खुला करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली आहे. हा डेक कार्यान्वित झाल्यास स्थानकावरील प्रवाशांच्या गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल आणि पादचारी वाहतुकीवरील ताण कमी होईल, असे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
महिला आणि बालकांसाठी हिरकणी कक्ष
महिला प्रवाशांना लहान बालकांना स्तनपान करण्यासाठी तसेच बालकांची निगा राखण्यासाठी सुरक्षित आणि स्वतंत्र जागा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी मिरा रोड आणि भाईंदर या दोन्ही स्थानकांवर ‘हिरकणी कक्ष’ किंवा बेबी फीडिंग अँड केअर रूम उभारण्याची खासदार नरेश म्हस्के यांनी मागणी केली.
भाईंदर स्थानकावर सरकते जिने किंवा लिफ्टची सुविधा
भाईंदर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर प्रवाशांना ये-जा करताना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले आणि आजारी प्रवाशांसाठी जिन्यांचा वापर त्रासदायक ठरू शकतो. ही गैरसोय दूर करण्यासाठी संबंधित फलाटांवर सरकते जिने उभारावेत, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. तांत्रिक कारणांमुळे सरकते जिने उभारणे शक्य नसल्यास लिफ्टची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पर्यायही खासदार नरेश म्हस्के यांनी सुचविला.
गर्दीच्या वेळेत अतिरिक्त एसी लोकल चालवा
मिरा रोड आणि भाईंदर परिसरातून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गर्दीच्या वेळेत लोकल गाड्यांमध्ये होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता या मार्गावर अतिरिक्त वातानुकूलित लोकल फेऱ्या सुरू करण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केली. प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी आणि सध्याच्या गाड्यांवरील गर्दीचा ताण कमी व्हावा, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश आहे.



