22 ऑक्टोबरला नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ई-कचरा विशेष संकलन मोहीम
नवी मुंबई प्रतिनिधी- घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 नुसार कचरा वर्गीकरणावर विशेष भर दिला जात असून 22 ऑक्टोबर रोजी नमुंमपा मुख्यालयात ‘ई-कचरा संकलन विशेष मोहीम’ राबविली जात आहे.
भारत सरकारच्या प्रशासकीय सुधारणा व सार्वजनिक तक्रार निवारण विभाग (DARPG) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच खनिज मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या विशेष अभियान 6.0 (SPECIAL CAMPAIGN 6.0) अन्वये ई-कचरा संकलन मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी “ई-कचरा संकलन विशेष मोहीम’ आयोजित करण्यात आलेली आहे.
तशा प्रकारचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या स्वाक्षरीचे पत्र घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत महानगरपालिकेतील सर्व विभागांना देण्यात आलेले असून महानगरपालिका मुख्यालय तसेच महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये, विभाग व आस्थापनांमध्ये वापरात नसलेली, नादुरुस्त अथवा कालबाह्य झालेली इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणे जमा करणे अपेक्षित असल्याचे सूचित करण्यात आलेले आहे. हे करताना ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे तसेच पर्यावरणीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे नमूद करण्यात आलेले आहे.
त्या अनुषंगाने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपल्या विभागातील सर्व प्रकारच्या ई-कचऱ्याची सविस्तर यादी तयार करून सदर ई-कचरा एकत्रितपणे जमा करण्याची कार्यवाही करावयाची आहे. यामध्ये संगणक, मॉनिटर, प्रिंटर, स्कॅनर, की-बोर्ड, माऊस, यूपीएस, बॅटरी, विद्युत उपकरणे, दूरध्वनी संच, नेटवर्किंग उपकरणे तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साहित्याचा समावेश असेल.
ही कार्यवाही करताना प्रत्येक विभागाने आपल्या विभागातील वापरात नसलेल्या, अथवा कालबाह्य इलेक्ट्रॉनिक व विद्युत उपकरणांची वस्तुनिहाय यादी तयार करावयाची असून त्यामध्ये उपकरणाचे नाव, संख्या, उपलब्ध असल्यास मालमत्ता क्रमांक, उपकरणाची स्थिती व संबंधित विभागाचे नाव नमूद करावयाचे आहे.
ई-कचऱ्याची यादी तयार करताना संबंधित उपकरणे निर्लेखित करणे आवश्यक असल्यास, प्रचलित नियमांनुसार स्वतंत्र कार्यवाही करावी व सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीशिवाय कोणतेही शासकीय साहित्य विल्हेवाटीसाठी हस्तांतरित करू नये असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.
अशाप्रकारे विभागातील संकलित ई-कचरा घनकचरा व्यवस्थापन विभागाने निश्चित केलेल्या ठिकाणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी जमा करण्यात येणार आहे.
याशिवाय महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी यांना आपल्या घरातील कोणताही ई-कचरा स्वयंस्फूर्तीने सदर मोहिमेत जमा करावयाचा असल्यास ते करू शकतात. यामध्ये जमा करू शकणा-या वस्तूंची यादीही देण्यात आलेली असून त्यामध्ये – टीव्ही (कृष्णधवल), टीव्ही (रंगीत), एलसीडी/एलईडी/प्लाझ्मा तसेच एअर कंडिशनर – १.० टन व १.५ टन, डेस्कटॉप, लॅपटॉप, प्रिंटर, कीबोर्ड, माऊस, टोनर, रॅम व काट्रेज अशी संगणकीय उपकरणे, मोबाईल फोन, स्मार्टफोन, फीचर फोन, विविध क्षमतेचे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव्ह, डिशवॉशर, पंखा, गीझर, स्टॅबिलायझर, यूपीएस, हीटर, टोस्टर, मिक्सर ग्राइंडर, इंडक्शन, टेप रेकॉर्डर, रेडिओ, स्पिकर, व्हीसीआर, डीव्हीडी, राउटर इ. वस्तूंचा समावेश आहे.
सदर मोहीमेच्या अनुषंगाने निसर्गाला पर्यावरणविषयक हानी पोहचविणारा ई-कचरा संकलित करून त्याची शास्त्रोक्त पध्दतीने योग्य विल्हेवाट लावण्यात येणार आहे.