मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – ज्या आस्थापनांवर 25 किंवा त्यापेक्षा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापनांनी ३१ ऑक्टोंबर पर्यंत आपल्याकडील मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरण पत्र ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.
या आस्थापनांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग/ व्यवसाय/ महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद / पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील २५ किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार , व्यवसाय, कारखाने यांचा समावेश होतो. अशा आस्थापनांना सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा १९५९ व त्या अंतर्गत नियमावली १९६० नुसार त्रैमासिक विवरणरपत्र नमुना ई-आर १ तिमाही संपल्यानंतर म्हणजेच सप्टेंबर – २०२६ अखेर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुसार विवरणपत्र दि. ३१ ऑक्टोंबर पर्यंत सादर करावे.
विवरणपत्र ऑनलाईन कसे सादर कराल?
यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लिक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ई-आर रिपोर्ट मधील ई-आर १ या ऑप्शनवर क्लिक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनिक सुट्या वगळून सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यत या कार्यालयाच्या (०२४०) २९५४८५९ दूरध्वनीवर संपर्क साधावा.
विवरणपत्र सादर न करणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल, याची नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे.