सेवा संकल्प अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे ‘मिशन रेबीज’तर्फे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न
छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी: सेवा संकल्प अभियानांतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी सत्र क्रमांक ५७ च्या प्रशिक्षणार्थींसाठी ‘रेबीज आजार : लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना’ या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. केंद्राचे प्राचार्य मा. डॉ. संतोष कडले व मा. डॉ. पल्लवी पगडाल, साथरोगशास्त्रज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीरीत्या पार पडली.
जागतिक स्तरावर कार्यरत ‘मिशन रेबीज’ (WVS-HOPE) या संस्थेने कार्यशाळेत सहभाग घेतला. संस्थेचे शिक्षण अधिकारी मा. श्री. आकाश बेडवाल यांनी प्रशिक्षणार्थींना रेबीज आजाराविषयी सखोल व तांत्रिक मार्गदर्शन केले. रेबीज हा प्राणघातक आजार असला, तरी योग्य वेळी घेतलेली खबरदारी, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि वेळेवर मिळणारे उपचार यामुळे प्राण्यांच्या दंशामुळे होणाऱ्या या धोक्यापासून बचाव करता येतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेदरम्यान प्राण्यांच्या दंशानंतर घ्यावयाची तातडीची काळजी, जखमेची प्राथमिक स्वच्छता, वेळेवर लसीकरण व उपचार तसेच रेबीज प्रतिबंधासाठी आवश्यक जनजागृती याबाबत प्रशिक्षणार्थींना व्यावहारिक माहिती देण्यात आली.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी श्री. ज्ञानोबा भोसले, श्री. अशोक नरवडे, श्री. श्याम सावंत, श्रीमती अलका मानकर, श्रीमती सीता सिरसाठ, श्रीमती आशा जाधव, श्री. महेंद्र वाघमारे व श्री. महेश गीते यांच्यासह प्रशिक्षण केंद्रातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी सत्र क्रमांक ५७ चे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अद्ययावत करण्यावर भर देण्यात येत असून, या कार्यशाळेमुळे रेबीज नियंत्रण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृतीबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना अद्ययावत व व्यावहारिक माहिती मिळाली. या ज्ञानाचा उपयोग ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना प्रभावी आरोग्य सेवा व मार्गदर्शन देण्यासाठी होणार आहे.