
सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना 25 हजारांचे कन्यादान अनुदान
जालना,द प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र वधूच्या वडिलांच्या, आईच्या किंवा पालकांच्या नावे 25 हजार रुपयांचे अनुदान क्रॉस चेकद्वारे देण्यात येते.
तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक पात्र जोडप्यामागे 4 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी वराचे वय 21 व वधूचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे, अशी अट आहे
सन 2026-27 या वर्षासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यास इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेच्या अर्थसहाय्यासाठी अर्जाचा नमुना संबंधित कार्यालयात उपलब्ध असून, इच्छुक संस्थांनी तो प्राप्त करून प्रस्ताव सादर करावा. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक अविनाश बहिर यांनी केले आहे
-*-*-*-*-*-*-*-*-



