
उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी काळजी घेण्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे आवाहन
ठाणे, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने प्रादेशिक हवामान विभागाकडून ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उष्माघातासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात, हे लक्षात घेऊन नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.
उष्णतेच्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाने खालील उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
उष्णतेच्या लाटेदरम्यान लहान मुलं व वृद्ध यांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेताना या काळात सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत.
• हलके खावे, फळे आणि सलाड सारखे पचायला हलके असणारे अन्न खावे.
• पुरेसे पाणी प्या. तहान नसली तरी दर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.
• गॉगल / छत्री/टोपी/बूट/चप्पल घालूनच घराबाहेर पडावे.
• प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्याजवळ बाळगावी.
• थंड पाण्याने आंघोळ करावी.
• घराबाहेरील उपक्रम / मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत चला व विश्रांतीची वारंवारता वाढवावी.
तसेच डोकेदुखी, ताप, उलट्या, जास्त घाम येणे आणि बेशुध्द पडणे, अशक्तपणा जाणवणे, शरीरात पेटके येणे, नाडी असामान्य होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास काळजी घ्यावी. उष्माघाताची लक्षणे आढळल्यास अशा व्यक्तीला सावलीच्या ठिकाणी झोपवा, व्यक्तीचे कपडे सैल करा.त्याला द्रव पदार्थ, कैरीचे पन्हे पाजा.
तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवा. बाधित व्यक्तीला तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा आणि वैद्यकीय सल्ला घ्या. अतिकष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत. जेव्हा सूर्यप्रकाश प्रखर नसेल तेव्हाच अशी कामे करा. नागरिकांनी वरील काळजी घ्यावी, असे आवाहनही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000



