बांधकाम साईट्सवरील वायू प्रदूषण टाळण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून प्रत्यक्ष तपासणी….
नवी मुंबई प्रतिनिधी सध्या थंडीच्या कालावधीत प्रकर्षाने जाणवणारे हवेतील धुरक्याचे (SMOG) वाढलेले प्रमाण लक्षात घेत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक काटेकोर व प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिले होते. त्यामध्ये प्रामुख्याने शहरात सुरु असलेल्या बांधकाम साईट्सवर धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपरणे राबविल्या जात असल्याची प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करण्याचे निर्देश नगररचना विभागास दिले होते. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळल्यास साईटवरील बांधकाम आठवडयाभरासाठी बंद करावे असे निर्देशित केले होते.
त्यास अनुसरून सहा.संचालक नगररचना श्री.सोमनाथ केकाण यांच्या नियंत्रणाखाली नगररचना विभागातील अभियंते आणि विभाग कार्यालयातील अभियंते यांना बांधकाम साईट्सची क्षेत्रे नेमून देण्यात आली असून त्याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन वायू व ध्वनी प्रदूषण विषयक उपाययोजना व्यवस्थितरित्या राबविल्या जात असल्याची खातरजमा केली जात आहे. अशाच प्रकारे विभाग कार्यालय स्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या पथकांव्दारे दगडखाणी, सिमेंट निर्मितीचे आरएमसी प्लान्ट, कोळशाचा वापर करणा-या बेकरी व तंदूर भट्ट्या यांचीही तपासणी करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील बांधकाम प्रकल्पांदरम्यान होणाऱ्या वायू व ध्वनी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मा.उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्वतःहून दाखल केलेल्या (Suo-Moto) जनहित याचिका (PIL No. ३/२०२३) मध्ये दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी आदेश पारित करून बांधकाम स्थळांवरील प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
मा. उच्च न्यायालयाचे आदेश व नागरिकांकडून प्राप्त तक्रारी विचारात घेऊन, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मान्यतेने मानक कार्यप्रणाली (SOP)’ तयार करण्यात आली असून दि. 01 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या मानक कार्यप्रणाली (SOP) नुसार सर्व बांधकाम साईट्सवर धूळ, ध्वनी व वायू प्रदूषणरोधक उपाययोजना करणे अनिवार्य आहे.
l संरक्षक कुंपण (Barricading): संपूर्ण बांधकाम क्षेत्राभोवती किमान २० फूट उंचीचे लोखंडी पत्र्याचे कुंपण उभारणे. l धूळ नियंत्रणासाठी फॉगिंग आणि स्प्रिंकलर प्रणाली : बांधकाम स्थळी नियमितपणे फॉगर्स आणि स्प्रिंकलर्सचा वापर करून धूळ कमी करणे.
l वाहनांच्या चाके धुण्याची व्यवस्था (Wheel Wash System): बांधकाम साईटमध्ये आगमन, निर्गमन होताना वाहनांची चाके धुणे अनिवार्य आहे. l वाहतुकी दरम्यान बांधकाम साहित्य झाकून नेणे : सिमेंट, वाळू, माती व इतर धूळकट साहित्याची पूर्णपणे झाकलेल्या वाहनांतूनच वाहतूक करणे.
l सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे: बांधकाम साईटवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवून नियमांचे पालन नोंद करणे.
l पदपथ व सार्वजनिक रस्ते स्वच्छ ठेवणेः बांधकाम साईटच्या बाहेरील पदपथ व रस्त्यांवर धूळ साचू नये यासाठी नियमित स्वच्छता करणे. l साईटवरील साहित्य झाकून ठेवणे: वाळू, सिमेंट, क्रश मटेरियल यांसारखे धूळकट साहित्य ताडपत्रीने झाकून ठेवणे. l डीजी सेटसाठी ध्वनीरोधक व्यवस्था: जनरेटर सेटसाठी सायलेन्सर व ध्वनीरोधक कवच बसविणे. l बांधकाम कचरा व पाडकाम कचरा व्यवस्थापन: बांधकामातील अवशेष व मलबा याची अधिकृत ठिकाणीच विल्हेवाट लावणे. l कामकाजाचे वेळापत्रक: ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी नेमून दिलेल्या वेळेतच बांधकाम करणे.
वरील सर्व उपाययोजना नवी मुंबई महानगरपालिकेच्या “मानक कार्यप्रणाली (SOP)” नुसार काटेकोरपणे पालन करणे सर्व विकासक, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि प्रकल्प प्रवर्तक यांच्यासाठी अनिवार्य आहे, तरी दंडात्मक कारवाई तसेच ‘काम बंद (Stop Work)’ कारवाई टाळण्यासाठी सर्व विकासक, बांधकाम व्यावसायिक, कंत्राटदार आणि प्रकल्प प्रवर्तक यांनी ‘मानक कार्यप्रणाली (SOP)’ मधील उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करावी असे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सूचित करण्यात येत आहे.