vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबईतील अभिनव वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केली पाहणी

नवी मुंबईतील अभिनव वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पाची महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी केली पाहणी

       राज्य प्रतिनिधी-   केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालय अंतर्गत वस्त्र समिती आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर येथे सुरू असलेल्या वस्त्र पुनर्प्रक्रिया प्रकल्पास (TRF) नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी भेट देत पाहणी केली आणि बहुउपयोगी अशा या पर्यावरणशील प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले.

          याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार, नगरसेविका श्रीम.अंजनी भोईर, श्रीम.रेखा म्हात्रे, श्रीम.स्वाती गुरखे, श्रीम.सुरेखा नरबागे, श्रीम.संतोषी म्हात्रे, टीआरएफ प्रकल्पाच्या विभागप्रमुख तथा उद्यान उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, केंद्रीय वस्त्र समितीचे संचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ.तपनकुमार रौत, प्रकल्प संचालक श्री.प्रकाश सैनी, मुख्य डिझायनर श्रीम.नुतन कजबजे, प्रकल्प व्यवस्थापक श्रीम.वैशाली कदम आणि टिआरएफ समुह उपस्थित होते.

          कपड्याचा कचरा कमी करण्यासोबतच त्याला पुनर्प्रक्रियेव्दारे नवे रूप देऊन फॅशन सेन्स राखत फॅशनेबल उत्पादने निर्मिती करणारा हा आगळावेगळा इकोफ्रेंडली उपक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकारने नवी मुंबईची निवड केली ही अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी व्यक्त केले. या माध्यमातून महिलांना रोजगाराचे हक्काचे साधन उपलब्ध होत असल्याने त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असून महिला सक्षमीकरणासोबतच तिला आत्मनिर्भर बनविणा-या या प्रकल्पाचा विस्तार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. हा इतका चांगला उपक्रम आहे की इतरही शहरे याचे अनुकरण करतील असे सांगताना याठिकाणी काम करणा-या महिलांशी त्यांनी संवाद साधला. यापूर्वी घरकाम करणा-या अनेक महिला येथे आपल्या आवडीचे कौशल्यपूर्ण काम करून रोजगार मिळवत असल्याचा आनंद वाटतो अशी प्रतिक्रिया यावेळी महापौर महोदयांनी दिली.

          यावेळी उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे यांनी सदर प्रकल्पाविषयी प्रारंभिक माहिती दिली व या प्रकल्पाच्या माध्यमातून कच-यात जाणारा कपडा पुनर्वापरात येत असल्याने कापडाच्या कच-यात घट होते, कच-यात टाकल्या जाणा-या कापडापासून बहुउपयोगी आकर्षक वस्तुंची पुनर्निर्मिती केली जाते तसेच या प्रक्रियेत काम करणा-या स्त्रियांना रोजगार उपलब्ध होतो असे या प्रकल्पाचे तीन महत्वाचे फायदे सांगितले.

          हा प्रकल्प अत्यंत उत्तम प्रकारे राबविण्यात येत असून नागरिकांनी वापरून झालेले व ते फेकून देतील असे कपडे सोसायट्यांमध्ये विशिष्ट प्रकारच्या कचरापेट्या ठेवून संकलित करण्यात येत आहेत. टाकाऊ मात्र सुस्थितीतील कपडे संकलनाकरिता विशेष वाहन ठेवण्यात आलेले आहे. सदर वाहन सोसायट्यांमध्ये जाऊन तसेच 92 ठिकाणी असलेल्या थ्री आर सेंटर्समधून कपडे संकलित करून प्रक्रियास्थळी आणते. याठिकाणी आलेल्या जुन्या कपड्यांचे श्रेणीनुसार वर्गीकरण होते, त्यावर कपड्याच्या स्थितीनुसार अनुरूप प्रक्रिया होते तसेच त्यातील पुरर्प्रक्रियायोग्य वस्त्रांपासून नव्या वस्तूंची निर्मिती (अपसायकलिंग) केली जाते. यामुळे क्षेपणभूमीवर जाणारा कापडी कचरा लक्षणीय प्रमाणात कमी होण्यास मदत होत आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, एसबीआय फाऊंडेशन आणि टिसर इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या या केंद्रामध्ये महिला बचत गटांतील महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार लोकसहभागावर भर देते सोसायट्या, वसाहती, थ्री आर सेंटर्स अशा विविध ठिकाणाहून आलेल्या जुन्या कपड्यांची छाननी करून त्यांचा पुनर्वापर व अपसायकलिंग करण्यात येते.

          या उपक्रमामुळे कचरा व्यवस्थापनास चालना मिळत असून पर्यावरण संवर्धनालाही मोठा हातभार लागत आहे. पंतप्रधान महोदयांनीही त्यांच्या मनोगतात या पर्यावरणस्नेही उपक्रमाचे यापूर्वीच विशेष कौतुक केले आहे. आज महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी सहकारी नगरसेविकांसह याठिकाणी भेट देत या अभिनव प्रकल्पाचे मुक्तकंठाने कौतुक केले व येथे निर्माण करण्यात येणा-या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असे सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

भारताच्या 79 वा स्वातंत्र्य दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ संपन्न झाला.

राज्य महिला व बालविकास विभाग महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे तालुकास्तरीय केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व न्यायिक मागण्या साठी क्रीडा संकुल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मागण्यांसाठी मोर्चा…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवीन सदस्य डॉ.दिलीप भुजबळ- पाटील यांनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रलंबित रस्ते कामांचा १५ दिवसात अहवाल सादर करा – विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे विलंब व दफ्तरदिरंगाईस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई

वर्सोवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांच्या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

vishwatmaklokswamivarta