
जागतिक दिव्यांग दिनी इटीसी केंद्रामार्फत आयोजित जनजागृती रॅलीला उत्साही प्रतिसाद …
नवी मुंबई प्रतिनिधी- नवी मुंबई महानगरपालिका इटीसी अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा केंद्राद्वारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून आज 03 डिसेंबर म्हणजेच जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून विशेष जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. समाजामध्ये दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे तसेच दिव्यांग मुलांना प्रोत्साहित करणे या हेतूने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
02 डिसेंबर रोजी इटीसी केंद्रातील दिव्यांग मुलांच्या पालकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डॉ.अमृता जोशी आणि श्री.सागर पगार यांनी पालकांना सुजाण पालकत्व या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले.
संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये होणा-या विविध उपक्रमांपैकी एक महत्वाचा उपक्रम म्हणजे आज 3 डिसेंबर रोजी दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणेकरिता आयोजित करण्यात येत आलेली रॅली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिव्यांगत्वाविषयी जनजागृतीकरिता विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नमुंमपा इटीसी केंद्रातील कर्मचारी, केंद्रामधील विविध प्रवर्गातील दिव्यांग मुले व त्यांचे पालक तसेच निर्भया फाऊंडेशनचे संस्थापक श्री.मनोज बर्डे व त्यांचे सहकारी उपस्थितहोते.
या रॅलीचा प्रारंभ इटीसी केंद्रामधून करण्यात आला. इटीसी केंद्र ते वाशी स्टेशन परिसर येथे रॅली आली असता मानवी साखळी करून दिव्यांगत्वाबाबत माहिती दर्शविणारे फलक व घोषणा याद्वारे दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करण्यात आली.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना इटीसी केंद्राच्या संचालिका डॉ.अनुराधा बाबर यांनी 3 डिसेंबर हा दिव्यांगत्व जनजागृतीसाठी महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. समाजातील सर्व स्तरांवर दिव्यांगांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या रॅलीची सांगता पुन्हा इटीसी केंद्रामध्ये येऊन करण्यात आली. रॅलीनंतर दिव्यांग मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या रॅलीमध्ये एकूण 440 दिव्यांग मुले त्यांच्या पालकांसह उपस्थित होती. या रॅलीसाठी केंद्राच्या संचालिका डॉ.अनुराधा बाबर यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व दिव्यांग मुले व पालक यांचा उत्साह वाढविला.
नमुंमपा आयुक्त़ डॉ. कैलास शिंदे यांनी दिव्यांगत्वाबाबत जनजागृती करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत यासाठी विविध उपक्रम राबवण्याकरिता नवी मुंबई महापालिका नेहमीच प्रयत्नशील आहे असे मत व्यक्त केले. अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार यांनीही दिव्यांगत्वामुळे खचून न जाता शिक्षण, प्रशिक्षण घेऊन समाजाचा एक महत्त्वाचा घटक बनण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. या रॅलीचे आयोजन इटीसी केंद्र संचालिका डॉ. अनुराधा बाबर यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले. रॅलीचे नियोजन तसेच नियंत्रण व देखरेख इटीसी केंद्राच्याअधीक्षक व कर्णबधिरविभाग, मतिमंद विभाग यांचे शैक्षणिक व्यवस्थापक यांनी केले.



