
घणसोली विभागातील 21 शाळांमधील 13 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतली ‘मतदार जागरूक दूत’ महाप्रतिज्ञा..
नवी मुंबई प्रतिनिधी -निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव हे लक्षात घेत 15 जानेवारी रोजी होणा-या नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने घणसोली परिसरात निवडणूकीच्या ‘स्वीप’ (SVEEP) उपक्रमांतर्गत ६, ८ आणि ९ प्रभागांच्या क्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिकणा-या तब्बल १३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांच्या परिसरात एकत्र येत एकाच वेळी सामूहिकरित्या ‘मतदार जागरूक दूत’ म्हणून प्रतिज्ञा घेतली.
‘आम्ही आज जरी मतदार नसलो, तरी मतदार जागरूक दूत म्हणून समाजाला नवी दिशा देऊ’ – असा ठाम निश्चय या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिज्ञेतून केला. या चिमुकल्या मतदान जागरूक दूतांनी शपथ घेतली की, ते मतदानाच्या जनजागृतीची आपल्या कुटुंबापासून सुरुवात करून शेजारी आणि नातेवाईकांना मतदानाचे महत्त्व पटवून देतील. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता प्रत्येकाने मतदान करावे, १००% मतदान व्हावे यासाठी हे विद्यार्थी आता घरोघरी संदेश पोहोचवणार आहेत.
या मतदानाच्या महासंकल्प मोहीमेत घणसोली आणि परिसरातील नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. ५५ व १०४ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर), शाळा क्र. ७८ गौतम नगर, शाळा क्र. ४० व ११३ महापे, शाळा क्र. ३९ हनुमान नगर, शाळा क्र. ४१ व १२३ अडवली भूतावली, शाळा क्र. ३४ व ११५ श्रमिक नगर, शाळा क्र. ४४ तळवली, शाळा क्र. ४२ घणसोली, शाळा क्र. १०५ घणसोली आणि शाळा क्र. ७६ घणसोली या नमुंमपा शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.
त्यासोबतच शेतकरी शिक्षण संस्था विद्यालय घणसोली, नवी मुंबई सिटी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज घणसोली, टिळक एज्युकेशन सोसायटी ग्लोबल स्कूल घणसोली, राजीव गांधी कॉलेज घणसोली, प्रेरणा हिंदी विद्यालय घणसोली, शारदा हिंदी विद्यालय रबाळे आणि इंदिरा गांधी विद्यालय रबाळे या खाजगी शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांनीही आपल्या शाळेच्या पटांगणात एकत्र येत आम्ही लोकशाहीचे रक्षक होणार हा ठाम निश्चय व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप कार्यक्रमांतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यामध्ये अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, निवडणूक विषयक स्वीप उपक्रमांचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अजय गडदे, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम.संघरत्ना खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली विभागातील शाळांमध्ये हा मतदान महासंकल्प उपक्रम भव्यतम स्वरूपात राबविण्यात आला.
घणसोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. कल्पना गोडे, विभाग अधिकारी श्री. वसंत मुंडावरे, कार्यकारी अभियंता श्री. यशवंत कापसे आणि घणसोली विभागाचे स्वीप कार्यक्रम प्रमुख उपअभियंता श्री. संतोष मोरस्कर यांच्या सुयोग्य नियोजनामुळे या मोहिमेला मोठे स्वरूप प्राप्त झाले. स्वीप समन्वयक अधिकारी श्री. कमलेश इंगळे यांनी या सर्व शाळांच्या समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
विद्यार्थ्यांनी एकत्र येत मतदानविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या घेतलेल्या प्रतिज्ञेची अंमलबजावणी त्यांचे पालक, कुटुंबीय, शेजारी व परिचित यांच्यामध्ये जनजागृतीसाठी होईल व त्याचा निश्चित लाभ मतदानाची टक्केवारी वाढण्यात होईल असा विश्वास पालक आि नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
#



