भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुक्त प्रशासनासाठी कटिबद्ध राहा; रायगडला सेवा हक्क अंमलबजावणीत राज्यात आदर्श बनवूया — जिल्हाधिकारी किसन जावळे
रायगड, प्रतिनिधी-सामान्य नागरिकाला शासकीय सेवा मिळवताना होणारा मनस्ताप, विलंब आणि कागदपत्रांचा डोंगर आता इतिहासजमा होणार असून, रायगड जिल्ह्याला सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्यात अग्रक्रमांकावर नेण्याचा निर्धार जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी व्यक्त केला.
‘सेवा हक्क दिना’चे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित विशेष कार्यक्रमात त्यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभाराची शपथ दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी जावळे यांनी प्रशासकीय मानसिकतेत बदलाची गरज अधोरेखित करताना स्पष्ट केले की, देशाला विकसित आणि समृद्ध करण्याच्या प्रवासात सामान्य जनतेला केंद्रबिंदू मानणे अत्यावश्यक आहे. सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यापेक्षा नागरिकांना घरबसल्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी कंबर कसण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विशेषतः सेतू केंद्रांमध्ये कामासाठी येणाऱ्या जनतेशी सौजन्याने वागून, त्यांना विनाकारण ताटकळत न ठेवता अनावश्यक कागदपत्रांची मागणी टाळावी, असे त्यांनी निर्देश दिले. ज्या विभागांची कामगिरी सध्या समाधानकारक नाही, त्यांनी तातडीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ मधील तरतुदींचा सखोल अभ्यास करून आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी. प्रत्येक विभागाची सेवा वितरणाची टक्केवारी ९८ च्या पुढे असणे आवश्यक असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्या किंवा सुमार कामगिरी करणाऱ्या विभागांसाठी पाच हजार रुपयांच्या दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी देखील प्रशासकीय यंत्रणेला अधिक गतीमान होण्याचे आवाहन केले. शासकीय सेवा देताना केवळ औपचारिकता न पाळता त्या सेवा पात्र नागरिकांपर्यंत विहित मुदतीत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी सेवा हक्क अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व उत्कृष्ट सेवा वितरणाबद्दल काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. संतोष दराडे (सहा. पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा), श्री. मितेश विलास म्हात्रे (पोहेका/२३२०, जिल्हा विशेष शाखा), श्री. संतोष जनार्दन रूपनवर (पोहेका/१०७२, खोपोली पोलीस ठाणे), श्री. दिनेश कृष्णा भंडारे (पोहेका/११८०, खालापूर पोलीस ठाणे), श्रीमती मनीषा वामनराव जयभाये (ग्रामपंचायत अधिकारी, करंजाडे), श्री. विजय किसन अहिरे (ग्रामपंचायत अधिकारी, वरसे), श्री. वैभव बाळकृष्ण पाटील (ग्रामपंचायत अधिकारी, वारसावे), श्री. मुकेश पखाळ (उपविभागीय अधिकारी, अलीबाग), श्री. संदीप सानप (उपविभागीय अधिकारी, माणगाव), श्री. भंजनजय जाधव (तहसीलदार, कर्जत), श्रीमती राजश्री साळवी (महसूल नायब तहसीलदार, मुरुड) व श्री. भारत फुलमाळी (निवासी नायब तहसीलदार, सुधागड) यांचा समावेश होता.
या दिनानिमित्त घेण्यात आलेल्या शपथेमध्ये, “मी गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की, मला सुपुर्द केलेली जबाबदारी पूर्ण प्रामाणिकतेने, निष्ठेने आणि संवेदनशीलतेने पार पाडेन,” अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी आपली कटिबद्धता जाहीर केली.
आगामी वर्षभरात जिल्ह्याला ‘स्मार्ट आणि लोकाभिमुख’ सेवांचे मॉडेल बनवण्यासाठी महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद यांसारख्या सर्व महत्त्वाच्या यंत्रणांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी रवींद्र शेळके, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.