vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव..योग आणि निरोगी वृद्धत्वावर आधारित जागतिक वैज्ञानिक अभ्यासांमध्ये गेल्या दशकात लक्षणीय वाढ..

 

आरोग्य प्रतिनिधी-येत्या 21 जून, 2026 रोजी साजरा होणाऱ्या 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना — “निरोगी वृद्धत्वासाठी योग” अशी आहे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक सुदृढतेचा विकास करण्यासाठी नियमित योग करणे ही एक समग्र जीवन पद्धती असून याला जगभरातून वाढती मान्यता दिसून येत आहे. भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेत रुजलेला आणि जगभरातील विविध खंडांमध्ये स्वीकारला गेलेला योग, आता निरोगी आणि सक्रिय जीवनाकडे नेणारा एक विश्वासार्ह मार्ग म्हणून उदयास आला आहे. ही संकल्पना योगशास्त्रामध्ये असलेले चैतन्य, कणखरपणा आणि स्वावलंबन जोपासण्याची परिवर्तनकारी क्षमता अधोरेखित करते. तसेच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि समग्र सुदृढतेचा एक मुख्य आधारस्तंभ म्हणून योगशास्त्राची भूमिका अधिक दृढ करते.
या संकल्पनेच्या महत्त्वाविषयी बोलताना, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री, प्रतापराव जाधव म्हणाले, “या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ ही संकल्पना आजच्या काळात अत्यंत समर्पक आणि महत्त्वाची आहे. सध्‍याच्या काळात माणसाचे आयुर्मान सातत्याने वाढत असताना, आपण सन्मानपूर्वक आणि निरोगीपणे वृद्ध होण्याची कला शिकणे अत्यंत गरजेचे आहे. ही संकल्पना भारताच्या प्राचीन संस्कृतीत अतिशय सुंदरपणे मांडली गेली आहे. त्यामध्‍ये आपल्या ऋषी-मुनींनी योग आणि आध्यात्मिक शिस्तीच्या बळावर दीर्घायुष्य आणि निरोगी आरोग्य टिकवून ठेवले होते.”
ही संकल्पना केवळ मानवी आयुर्मान वाढवण्यावरच नाही; तर ‘आरोग्यमान’ वाढवण्यावरही लक्ष केंद्रित करते — ‘आरोग्यमान’ म्हणजे आपल्या आयुष्याचा जो काळ आहे, तो आपण उत्तम आरोग्यासह व्यतीत केला पाहिजे. विविध शारीरिक आसने, श्वासोच्छ्वासाचे व्यायाम, ध्यान आणि सजगता यांच्या संयोगातून, योग आपल्याला वृद्धत्वाची प्रक्रिया सुरू असतानाही शारीरिक हालचालीची क्षमता, मानसिक सुदृढता आणि भावनिक कणखरपणा टिकवून ठेवण्यासाठी एक समग्र आणि परिपूर्ण दृष्टीकोन प्रदान करतो.
वाढती वैज्ञानिक मान्यता,निरोगी वृद्धत्वामध्ये योगची भूमिका आता जागतिक वैज्ञानिक समुदायाचे अधिकाधिक लक्ष वेधून घेत आहे. ‘PubMed Central’ या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, “निरोगी वृद्धत्वासाठी योग” या विषयाशी संबंधित संशोधनपर प्रकाशनांच्या संख्येमध्‍ये गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 2014 मध्ये या विषयावर केवळ 183 शोधनिबंध प्रकाशित झाले होते. त्यानंतर 2025 पर्यंत ही संख्या वाढून 1,207 प्रकाशनांपर्यंत पोहोचली आहे. 2020 मध्ये संशोधनाचे प्रमाण 500 प्रकाशनांचा टप्पा ओलांडून पुढे गेले आणि त्यानंतरही त्यामध्‍ये सातत्याने वाढ होत आहे. हे वाढते प्रमाण, वयोमानानुसार उद्भवणाऱ्या शारीरिक आणि मानसिक आव्हानांचा सामना करण्यात योगच्या भूमिकेविषयीची वैज्ञानिक स्तरावरील वाढती रुची दर्शवते.
निरोगी वृद्धत्वावर दिला जाणारा भर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक केंद्रित अर्थव्यवस्थेत वेगाने होणाऱ्या वाढीशी निगडित आहे. या अर्थव्यवस्थेत प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक असणारी उत्पादने आणि सेवांचा समावेश होतो. भारतात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांवर केंद्रित असलेल्या या अर्थव्यवस्थेचा आकार ज्यामध्ये आरोग्य सेवा, निरामयता सेवा, पुनर्वसन, सहाय्यभूत जीवनप्रणाली, डिजिटल आरोग्य आणि वृद्धांची काळजी यांचा समावेश आहे, सध्या सुमारे 73,000 कोटी रुपये इतका अंदाजित असून, येत्या काही वर्षांत यामध्ये लक्षणीय वाढ होण्याची दाट शक्यता आहे.
जागतिक स्तरावर 45 ते 64 वर्षे वयोगटातील व्यक्ती मोठ्या ग्राहकवर्गाच्या रूपात उदयास येत असल्याने प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि आरोग्यदायी जीवनशैलीविषयक उपाययोजनांची मागणी सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर योग हा निरोगी वृद्धत्व आणि सक्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणारा, कमी खर्चिक तसेच सर्वांना सहज उपलब्ध होणारा प्रभावी उपाय म्हणून पुढे येत आहे. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जपण्यास मदत होते, ज्यामुळे व्यक्ती दीर्घकाळ निरोगी आणि स्वावलंबी जीवन जगू शकतात.
आयुष मंत्रालयाचे उपक्रम,योगाला वर्षभर अंगीकारली जाणारी आरोग्यवर्धक पद्धती म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेमधील त्याची भूमिका अधिक बळकट करण्यासाठी आयुष मंत्रालयाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यामध्ये मंत्रालयाने पुराव्यावर आधारित तयार केलेल्या असंसर्गजन्य रोग आणि लक्ष्यित गटांसाठी 10 योग कार्यपद्धती या उपक्रमाचा समावेश आहे. यामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कार्यपद्धतीचाही समावेश आहे. हि कार्यपद्धती वयानुरूप योगाभ्यासांच्या माध्यमातून लवचिकता, संतुलन, हालचालींची क्षमता, श्वसन कार्यक्षमता आणि भावनिक स्वास्थ्य वाढविण्यावर भर देते.
मंत्रालय योग 365 या उपक्रमालाही प्रोत्साहन देत आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या वार्षिक आयोजनापलीकडे जाऊन योगाचा दैनंदिन स्वीकार करण्यास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तंत्रज्ञान-सक्षम व्यासपीठे आणि घरबसल्या योगाभ्यासासाठी तयार करण्यात आलेल्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून योग सर्वांसाठी सुलभ बनविणे, तसेच दैनंदिन योगाभ्यासात अधिक व्यापक सहभाग सुनिश्चित करणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. योग समावेश हा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम असून, योगाचे लाभ समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचावेत, हा त्याचा उद्देश आहे. चेअर योग, कमी परिणामकारक योग दिनक्रम आणि समाज-आधारित आरोग्य सत्रे यांसारख्या सर्वसमावेशक कार्यक्रमांद्वारे हा उपक्रम ज्येष्ठ नागरिकांना स्वावलंबन, सामाजिक सहभाग आणि एकूणच आरोग्यपूर्ण जीवन टिकवून ठेवण्यासाठी सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो.

संबंधित पोस्ट

विशेष लेखः-मुलींच्या जन्माकडे सकारात्मकतेने बघा-:

vishwatmaklokswamivarta

शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहीमेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या उपस्थितीत आरंभ,गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही लस सर्व नमुंमपा रुग्णालये व नागरी आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध

स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ साजरा*28 रुग्णांची मोफत ‘इन्हीबिटर’ चाचणी, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत प्रभावी माध्यम- डॉ. संतोष बोराडे