
संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र अनिवार्य;लाभार्थ्यांसाठी 18 ते 31 ऑगस्ट दरम्यान विशेष शिबिर
अमरावती, प्रतिनिधी : संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अर्थात हयात प्रमाणपत्र (डिएलसी) सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. अमरावती तहसील कार्यालयाने 18 ते 31 ऑगस्ट या कालावधीत विशेष शिबिर आयोजित केले आहे. सर्व लाभार्थ्यांना विना विलंब हयात प्रमाणपत्र काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे
शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक लाभार्थ्याने बेनिफीशरी सत्यापन ॲपच्या माध्यमातून हयात डिजीटल लाईफ सर्टिफीकेट (डिएलसी) काढून आपण हयात असल्याचे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र सादर केल्यास संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचा शासकीय लाभ सुरु राहील. या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी अमरावती शहर संजय गांधी तहसील कार्यालयामार्फत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सर्व लाभार्थ्यांनी विना विलंब हे प्रमाणपत्र काढावे असे तहसिलदार डॉ. प्रियंका मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
लाभार्थी मोबाईलवर संबंधित अॅप डाउनलोड करून स्वतः डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार करू शकतात किंवा जवळच्या सेतू केंद्रात जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट काढून घेऊ शकतात तसेच तहसील कार्यालयातूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
00000000



