vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांना आवाहन

पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबईकरांना आवाहन

      नवी मुंबई प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने वर्षभरातील सर्व सण – उत्सव पर्यावरणपूरक साजरे करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या सूचनांचे काटेकोर पालन करुन आपले सण – उत्सव हे निसर्गाला पूरक आणि भूमी, वायू, अग्नि, जल, आकाश या नैसर्गिक पंचतत्वांचे रक्षण व संर्वधन करुन साजरे करावयाचे आहेत.

    त्या अनुषंगाने यावर्षी दि.14 सप्टेंबर 2026 पासून प्रारंभ होत असलेला विघनहर्ता श्रीगणरायाचा उत्सव हा प्रदूषणाचे विघ्न दूर करुन पर्यावरणपूरक प्लास्टिकमुक्त ‘इकोफ्रेंडली’ साजरा करावा असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात आले आहे.  याकरीता प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे असून त्यादृष्टीने खालील बाबींचे पालन करणे अपेक्षित आहे.

 श्रीगणेशमूर्ती चिकणमाती, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), प्लास्टिक आणि सिमेंट यांसारख्या साहित्यापासून बनवल्या जातात. या मूर्तींना सजवण्यासाठी बरेचदा विषारी रंगांचा वापर केला जातो. जेव्हा या मूर्तींचे विसर्जन केले जाते तेव्हा हे रंग व साहित्य पाण्यात पूर्णपणे विरघळत नाही, परिणामी पर्यावरणाचे प्रदूषण होते. त्याकरिता पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मुर्तींची प्रतिष्ठापना करण्यात यावी.

 गणेशोत्सवातील सजावटीसाठी थर्माकोल शीट्स आणि प्लास्टिक वापरून बनविलेल्या अविघटनशील साहित्याचा पर्यावरणावर दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे सजावटीत थर्मोकोल व प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून कागद, पुठ्ठे आणि कापडाचा वापर करण्यात यावा.  यादृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीडी बेलापूर येथील वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्रामार्फत कपड्यापासून अत्यंत आकर्षक अशा सजावट साहित्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्या कापडी सजावट साहित्याचा वापर करून नागरिक आपली सजावट अत्यंत आगळ्यावेगळ्या पध्दतीने करू शकतात. हे साहित्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावे याकरिता नमुंमपा मुख्यालय तसेच आठही विभाग कार्यालयांमध्ये या साहित्याचे विशेष स्टॉल मांडण्यात येत आहेत. त्याचा नागरिकांनी पर्यावरणपूरक दृष्टीकोन जपत मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.

 उत्सवांमध्ये डीजे, लाऊडस्पिकरमुळे होणारे ध्वनी प्रदूषण हा आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असून निवासी भागात सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत 55 डीबी आणि रात्री 10 ते मध्यरात्रीपर्यंत 45 डीबी पेक्षा जास्त आवाज नसावा. तसेच मध्यरात्रीनंतर लाऊडस्पीकरचा वापर करण्यास सक्त मनाई आहे.

 नवी मुंबई महानगरपालिकेने नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण कमी करण्याकरिता विसर्जनासाठी सर्वच विभागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करीत आहे. त्याची संपूर्ण माहिती जीपीएस लोकेशनसह नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवर व सोशल मीडियावर प्रसिध्द करण्यात येत आहे. नागरिकांनी जलप्रदूषण टाळण्यासाठी श्रीमूर्ती विसर्जनासाठी प्राधान्याने कृत्रिम तलावांचा वापर करावा. 6 फूट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व श्रीमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे.  कृत्रिम तलावातच श्रीमूर्तींचे विसर्जन करावे या जनजागृती कार्यात एक सामाजिक जबाबदारी म्हणून विविध स्वयंसेवी संस्था व पर्यावरणप्रेमी कृतीशील नागरिकांनी पुढाकार घ्यावा आणि विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांचा वापर करावा हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सक्रिय सहभागी व्हावे असे सर्व संस्थांना आवाहन करण्यात येत आहे.   पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचा दि. 01/08/2025 रोजीचा शासन निर्णय क्र. 2024 / प्र.क्र.34/ ता.क्र.03 यामधील सूचनांचे व नियमांचे काटेकोर पालन करावे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रसाद तयार करतांना अन्न व औषध प्रशासनाच्या नियमावलीचे काटेकारे पालन करुन भाविकांना पौष्टिक व भेसळमुक्त महाप्रसाद वितरीत करण्याची कार्यवाही करावी. श्रीगणरायाच्या आगमन व विसर्जन मिरवणूकीप्रसंगी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व गरोदर माता यांची विशेष काळजी घेण्यात यावी         महाराष्ट्र शासनाचे ‘माझी वसुंधरा अभियान, ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ आणि ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण अभियान’ या अनुषंगाने प्लास्टिक व थर्मोकोलमुक्त, कचरामुक्त, प्रदूषणमुक्त, फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक (ग्रीन फेस्टिव्हल) सण-उत्सव साजरा करावा. यादृष्टीने नागरिकांनी गणेशोत्सव कालावधीत प्लास्टिक व थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळावा आणि कापडी किंवा कागदी पिशवीचाच वापर करावा, सण समारंभामध्ये टाकाऊ वस्तुंचा व पुनर्वापर करण्यायोग्य वस्तुंचा जास्तीतजास्त वापर करावा, फटाक्यांचा वापर टाळावा आणि पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त ‘इकोफ्रेंडली श्रीगणेशोत्सव 2026’ साजरा करावा असे आवाहन नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित पोस्ट

३ जून २०२६ पासून जर्मनीमार्गे हवाई प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसाची अट रद्द .

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत एकतर्फी वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय नोंदवला

अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीस संलग्न गावे व शेतीला अपाय होणार नाही याची दक्षता घ्या-उद्योग मंत्री उदय सामंत..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

मिनी मंत्रालयाचा ३६ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर• प्रगत तंत्रज्ञान सक्षम समाज व शाश्वत ग्रामविकासाची संकल्पना…